महिला प्रचारक सांभाळताहेत प्रचाराची धुरा!
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघात महिला आघाड्यांकडून हाळदी-कुंकु, कोपरा सभांचे आयोजन
पुरूषांच्या बरोबरीने महिलांची संख्या असल्याने मतदान ठरणार निर्णायक
अहिल्या परकाळे कोल्हापूर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. या प्रचारामध्ये कोल्हापूर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचारारार्थ आमदार जयश्री जाधव, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, नंदाताई बाभूळकर तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शौमिका महाडीक, रूपाराणी निकम, गायत्री राऊत सक्रीय आहेत. हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने तर राजू शेट्टी यांच्या पत्नी व शेतकरी महिला प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. विशेष म्हणजे राजघराण आणि कोल्हापुरच नात वेगळच असल्याने श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या दोन्ही स्नुषांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत देशाचे चित्र पाहता सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारात त्यांची पत्नी, आई, वहीणी, बहीण किंवा एखादी अभिनेत्रीच स्टार प्रचारक म्हणून सक्रीय झालेल्या दिसतात. काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी-वधेरा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, भाजपाच्या स्मृती इराणी, शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यावर पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघाचा विचार करता, कोल्हापूर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांचा प्रचार करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून दोन्ही स्नुषा व महिला पदाधिकाऱ्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. शहरासह ग्रामीण भागात जावून महिलांच्या बैठक घेणे, हळदी-कुंकु कार्यक्रम, कोपरा सभा व महिला मेळावे घेवून राजघराण्याने सत्तेत नसतानाही केलेली विकास कामे पटवून सांगितली जात आहेत. चंदगड दौऱ्यात तर नंदाताई बाभूळकर यांनी संयोगिताराजे छत्रपती यांच्या गाडीचे सारथ्य केले. ही छबी सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली. तसेच भविष्यामध्ये महिलांसाठी कोणत्या योजना देणार यासंदर्भात आश्वासन देण्याचे काम या महिला स्टार प्रचारक करीत आहेत. शौमिका महाडीक यांची वक्तृत्वावर पकड असल्याने अनेक सभा, मेळावे त्या गाजवत आहेत. त्यांच्या जोडीला महिला कार्यकर्त्या आहेत. असे असले तरी हातकणंगले मतदार संघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा खासदार करण्यासाठी त्यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने यांनी कंबर कसली आहे.
प्रचाराचे नेटके नियोजन असल्याने मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठीची मोर्चेबांधणी अतिशय सूक्ष्म पध्दतीने त्या राबवत आहेत.
काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला आघाडीप्रमुख व कार्यकर्त्या महिला मेळाव्याचे संपूर्ण नियोजन करीत आहेत. महिला मतदारांची संख्या पुरुषांच्याबरोबरीने असल्याने प्रत्येक पक्षाने महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रीय होण्याच्या सूचना दिल्या आहेत. या महिला निवडणुकीपुरतेच नव्हे तर पूर्णवेळ महिला आघाडीत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण देवून त्यांच्याकडील कौशल्यावर आधारीत कामाची जबाबदारी वाटून दिलेली आहे. या आपल्या प्रभावी भाषणातून उपस्थितांना उमेदवार किंवा मुख्य प्रचारक येईपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आहेत.
महिला प्रचारकाच्या पायाला भिंगरी
कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी दोन्ही मतदार संघातील स्टार महिला प्रचारकांनी पायाला भिंगरी बांधली आहे. उन्हाचा तडाका वाढल्याने सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात वाडी-वस्तीवर जावून बैठका व हळदी-कुंकुचे कार्यक्रम घेतले जात आहेत. गेल्या महिनाभरापासून महिला प्रचारकांच्या सभांचे वेळापत्रकच ठरले आहे.