‘स्वावलंबिनी’तून महिला उद्योजकता विकास
खास महिलांमध्ये उद्योजकता विकासासाठी ठोस आणि विशेष प्रयत्न करण्यासाठी व उपक्रमाच्या नावाप्रमाणेच उद्योजक म्हणून खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारचा कौशल्य विकास विभाग व नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वावलंबिनी योजना नव्यानेच राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे.
‘स्वावलंबिनी’ योजनेची पार्श्वभूमी म्हणजे सुरुवातीला ही योजना विकसित शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत पूर्व भारत आणि उत्तर-पूर्व भारतातील प्रमुख शैक्षणिक संस्था व विद्यापीठ यांच्या माध्यमातून अमलात आणली गेली. या मागचा मुख्य उद्देश हा महिलांमध्ये शिक्षणाच्या जोडीलाच त्यांचा उद्योजक म्हणून विकास करणे व त्याद्वारा अशा प्रशिक्षित महिलांना स्वयंरोजगार देण्याच्या जोडीला त्यांनी इतरांना रोजगार देण्यासाठी सक्षम व्हावे, हा होता. या पहिल्या टप्प्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भुवनेश्वर पासून मिझोरम विद्यापीठ यासारख्या या क्षेत्रातील प्रमुख शैक्षणिक संस्थांचा आवर्जून समावेश करण्यात आला होता.
योजनेला पहिल्या टप्प्यात मिळालेले यश आणि प्रतिसाद पाहता केंद्र सरकारने आता योजनेची व्याप्ती व क्षेत्र यामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागचा मुख्य उद्देश देशातील निवडक क्षेत्रातील गरजू महिलांना त्यांचा कौशल्य विकास साधून त्यांना उद्योजक बनवणे हा आहे. नव्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांतर्गत ‘स्वावलंबिनी’ योजनेअंतर्गत निवड झालेल्या महिलांना त्यांच्या शिक्षण व कौशल्यावर आधारित कुटिरोद्योग-ग्रामोद्योग सुरू करणे, उद्योजकतेचे तंत्र आणि विकास, आर्थिक साक्षरतेसह आर्थिक व्यवहारांचे महत्त्व, बँकिंगच्या कार्यपद्धती, नव्या पद्धतीसह विचार आणि कामकाज करणे, आत्मविश्वास निर्माण करणे इत्यादीसह स्वत:च्या पायावर या महिलांनी उभे राहावे यावर विशेष भर आता दिला जाणार आहे.
आलेले अनुभव व केलेले प्रयत्न यावर आधारित ‘स्वावलंबिनी’ला अधिक व्यापक आणि परिणामकारक बनवले जात आहे. यासाठी विविध टप्प्यांवर आधारित विशेष अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाला अधिक व्यवहार्य व उपयुक्त बनवण्यासाठी हैदराबाद येथील राष्ट्रीय लघु-उद्योजक व्यवस्थापन विकास संस्था व नीती आयोग यांना आवर्जून सामावून घेण्यात आले आहे. अशाप्रकारे महिलांना अधिकाधिक सक्षम व प्रभावी लघु-उद्योजक बनवण्यासाठी प्रगत स्वरूपातील व अधिक समावेशक असे अभ्यासक्रम आता खालीलप्रमाणे तयार करण्यात आले आहेत.
उद्योजकता परिचय अभ्यासक्रम
या दोन दिवसीय विशेष अभ्यासक्रमात सुमारे 600 महिला प्रतिनिधींना व्यवसायाची संकल्पना, उद्योजकतेची मानसिकता व पूर्वतयारी, प्रचलित व्यावसायिक संधी व त्यांचा अभ्यास, विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक संसाधनांची जोडणी व लघु व्यवसाय नियोजन इत्यादी विषयांचा प्रामुख्याने समावेश केला जातो.
या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश हा संबंधित महिला प्रशिक्षणार्थींना स्वत:चा घरगुती वा लघुउद्योग सुरू करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण-प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये उद्योजकतेला पूरक मानसिकता तयार करणे हा आहे.
महिला उद्योजकता प्रशिक्षण अभ्यासक्रम
महिलांना त्यांचे शिक्षण व कौशल्यावर आधारित उद्योजकतेसाठी तयार करण्याच्या विशेष उद्देशाने या 40 तासांच्या विशेष प्रशिक्षण वर्गाचे नियोजन करण्यात आले आहे.
या विशेष अभ्यासक्रमात त्यामुळेच सुमारे 300 इच्छुक व निवडक महिला प्रशिक्षार्थींना कुटिरोद्योगांसह ग्रामीण स्तरावर लघु-उद्योग सुरू करणे, लघु उद्योगांचा विकास, प्रत्यक्ष वा थेट विक्रीची व्यवस्था, लघुउद्योगांसाठी आवश्यक असे प्रत्यक्ष सहकार्य, सहकारी प्रयत्नांचे महत्त्व, उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, लघुउद्योगांची नोंदणी व आवश्यक त्या प्रशासनिक व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे इत्यादी विषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येते. या मागे प्रशिक्षणाद्वारे महिलांची उद्योजकतेसाठी पूर्वतयारी करून घेणे हा आहे.
विशेष सहाय्यासह मार्गदर्शन
सहा महिने कालावधीच्या या विशेष सत्रात प्रशिक्षित महिला उमेदवारांना त्यांचे कौशल्य व प्रशिक्षणावर आधारीत व्यावसायिक संकल्पनांना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येते. या प्रक्रियेमध्ये उद्योग आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातील विषयतज्ञ व अनुभवी मंडळींचे विशेष मार्गदर्शन उपलब्ध केले जाते. याचा फायदा अर्थातच नव्याने लघु-उद्योग सुरू करणाऱ्या व नवउद्योजक महिलांना होत असतो.
उद्योजक प्रशिक्षक विकास अभियान
मोठ्या भौगोलिक क्षेत्रात व तेवढ्याच मोठ्या संख्येत नव्याने स्वयंरोजगार व लघु उद्योग सुरू करणाऱ्या महिलांना विशेष स्वरूपाचे मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी प्रशिक्षकांची गरज नेहमीच भासते. त्यामुळे उद्योजकता व अनुषंगिक विषयांशी संबंधित विषयांवर आपल्या अनुभवासह मार्गदर्शक म्हणून सक्रियपणे काम करण्यासाठी स्वावलंबिनी योजनेअंतर्गत दीर्घकालीन स्वरूपाची उद्योजक-प्रशिक्षक योजना आखण्यात आली आहे.
कौतुक-प्रोत्साहन योजना
‘स्वावलंबिनी’ योजनेअंतर्गत कौशल्य-प्रशिक्षण व मार्गदर्शन योजनेअंतर्गत सहभागी होऊन व त्यानुसार ज्या महिला हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून आपला लघु उद्योग-व्यवसाय सुरू करून त्यामध्ये प्रयत्नपूर्वक विशेष यश संपादन करतात त्या वेळेत व आवर्जुन यशस्वी होतात.
त्यांचे कौतुक अभिनंदन करणे गरजेचे असते. अशा कौतुकामुळे इतर महिलांना प्रोत्साहन-प्रेरणा मिळते. या दुहेरी दृष्टीकोनातून ‘स्वावलंबिनी’ योजनेत यशस्वी महिला लघु-उद्योजकांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन दिले जाते. महिलांना स्वत:च्या पायावर व खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनविण्याचा एक नवा व परिणामकारक पायंडा म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘स्वावलंबिनी’ या महिला उद्योजक प्रशिक्षण योजनेकडे पहायला हवे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी देशपातळीवर सर्वेक्षण करून निवडक विद्यापीठांना सामावून घेण्यात आले असून ‘स्वावलंबिनी’ योजनेला महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता इतर राज्यातील विद्यापीठ व प्रमुख शैक्षणिक संस्था यामध्ये सहभागी होतील असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. ‘स्वावलंबिनी’ योजनेची अंमलबजावणी आजवर विविध राज्यांमधील खालील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
► चौधरी चरणसिंह विद्यापीठ, मीरत-उत्तर प्रदेश.
► इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-भुवनेश्वर, ओडिसा.
► उत्कल विद्यापीठ-भुवनेश्वर, ओडिशा.
► उद्रार-पूर्व विद्यापीठ-शिलाँग, मेघालय.
► मिझोराम विद्यापीठ-ऐझवाल, मेघालय.
► गुवाहाटी विद्यापीठ-गुवाहाटी, आसाम.
► बनारस हिंदू विद्यापीठ- वाराणसी, उत्तर प्रदेश.
► हैद्राबाद विद्यापीठ-हैद्राबाद, तेलंगणा.
► मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ- हैद्राबाद, तेलंगणा.
► किसांग नांगवा शासकीय महाविद्यालय, जोवल-मेघालय.
► रिभोई महाविद्यालय, मेघालय.
► शासकीय महाविद्यालय, मिझोरम.
► लुंगलाय शासकीय महाविद्यालय, मिझोरम.
► हंडिग महाविद्यालय, गुवाहाटी-आसाम.
► दिसपूर महाविद्यालय, गुवाहाटी-आसाम.
- दत्तात्रय आंबुलकर