महिला बस प्रवाशांना मिळणार ‘स्मार्टकार्ड’
शक्ती योजनेंतर्गत सरकार दरबारी सकारात्मक चर्चा; स्मार्टकार्डसाठी 16 ते 17 रुपये खर्च अपेक्षित
बेळगाव : शक्ती योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थ्यांना स्मार्टकार्डचे वितरण केले जाणार आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवास करण्याची मुभा दिली जाणार आहे. शिवाय विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही आळा बसणार आहे. सरकारने पाच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये शक्ती योजनेचाही समावेश आहे. या अंतर्गत महिलांना मोफत प्रवास दिला जात आहे. यासाठी आता महिलांना स्मार्टकार्ड दिली जाणार आहेत. गतवर्षीपासून शक्ती योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील चार महामंडळांच्या बसमधून दररोज 45 लाख महिला मोफत प्रवास करत आहेत. त्यामुळे महामंडळांच्या उत्पन्नातही कमालीची वाढ झाली आहे.
सद्यस्थितीत महिलांना आधारकार्ड दाखवून मोफत प्रवास दिला जात आहे. मात्र आता स्मार्टकार्ड वितरीत केले जाणार आहे. काहीवेळा आधारकार्ड आणि इतर कारणावरून महिला प्रवासी आणि वाहकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडू लागले आहेत. शिवाय काही महिलांना मोफत तिकीट दिले जात असल्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी स्मार्टकार्ड दिले जाणार आहे. शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवासासाठी स्मार्टकार्ड दिली जाणार आहेत. याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू आहे. या निर्णयाला लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे महिलांच्या हातात आता आधारकार्डऐवजी स्मार्टकार्ड दिसणार आहेत. एका स्मार्टकार्डसाठी 16 ते 17 रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च प्रवाशांनी उचलावा की सरकारने उचलावा, याबाबतही चर्चा सुरू आहे.