महिलेचे 18 लाखांचे दागिने पळविले
मध्यवर्ती बसस्थानकाहून शिंदोळीला जाताना चोरट्यांनी मारला डल्ला
प्रतिनिधी/ बेळगाव
कागल तालुक्यातील कापशीहून शिंदोळी, ता. बेळगाव येथील माहेरी आलेल्या एका महिलेच्या बॅगमधील सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. मध्यवर्ती बसस्थानकापासून शिंदोळीला जाताना ही घटना घडली असून चोरट्यांनी 18 लाख 30 हजार रुपये किमतीचे दागिने पळविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दीपाली भरत पाटील, राहणार इंदिरानगर-कापशी, ता. कागल, जि. कोल्हापूर या गुरुवार दि. 20 नोव्हेंबर रोजी कापशीहून निपाणी-संकेश्वर मार्गे बेळगावला आल्या. मध्यवर्ती बसस्थानकापासून बसने शिंदोळी येथील आपल्या माहेरी जाताना अज्ञातांनी त्यांच्या बॅगमधील 183 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविल्याचे उघडकीस आले आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी 5.15 ते 6.20 या वेळेत ही घटना घडली असून मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक एच. एल. केरुर पुढील तपास करीत आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. काही महिन्यांपूर्वी मार्केट पोलिसांनी प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने पळविणाऱ्या निपाणी व बेळगाव येथील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
महिला गुन्हेगारांच्या टोळीला अटक केल्यानंतर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दागिने पळविण्याचे प्रकार कमी झाले होते. प्रवासी महिलांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने किंवा त्यांच्या बॅगेतील दागिने पळविण्याचे प्रकारही थंडावले होते. आता असे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. गुरुवारी घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. दीपाली या गुरुवारी दुपारीच कापशीहून निपाणीला आल्या. तेथून परिवहन मंडळाच्या बसने संकेश्वर मार्गे सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास बेळगावला पोहोचल्या. तेथून सिटी बसमधून शिंदोळीला जाताना ही घटना घडली असून मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.
? बसस्थानकावर दागिने चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय
? मार्केट पोलिसांकडून चोरीच्या घटनेचा पुढील तपास सुरू