For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदूनगरात महिलेचे गंठण लांबवले

06:58 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिंदूनगरात महिलेचे गंठण लांबवले
Advertisement

मोटारसायकलवरून आलेल्या भामट्याचे कृत्य

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

होंडा अॅक्टिव्हावरून घरी परतणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील गंठण मोटारसायकलवरून आलेल्या भामट्याने पळविले आहे. रविवारी रात्री हिंदूनगर-टिळकवाडी येथे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. रात्री उशिरा टिळकवाडी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.

हिंदूनगर-टिळकवाडी येथील 39 वर्षीय जयश्री या कामानिमित्त परगावी गेल्या होत्या. बसस्थानकावर आपली होंडा अॅक्टिव्हा उभी करून गेल्या होत्या. रात्री बेळगावात दाखल झाल्यानंतर आपल्या अॅक्टिव्हावरून घरी जाताना त्यांच्या घरापासून जवळच मोटारसायकलवरून आलेल्या एका भामट्याने त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे गंठण हिसकावले आहे.

गंठणाचा एक तुकडा खाली पडला आहे. त्यामुळे 20 ग्रॅमचा तुकडा भामट्याच्या हाती लागला आहे. रविवार दि. 26 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गंठण पळविणाऱ्या भामट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही.

होंडा अॅक्टिव्हावरून घरी जाताना घरापासून जवळच असलेल्या एका वळणावर त्या महिलेने आपल्या अॅक्टिव्हाचा वेग कमी केला. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या एका भामट्याने महिलेच्या गळ्यातील गंठणाला हात घालून हिसडा मारला. अचानक घडलेल्या घटनेमुळे धक्का बसूनही त्या महिलेने गंठण घट्ट धरून ठेवले. त्यामुळे दहा ग्रॅमचा तुकडा महिलेच्या हातात राहिला. टिळकवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.