सराफाला लुटणारी महिला जेरबंद
मिरज :
शहरातील शनिवार पेठ, सराफकट्टा येथे रामचंद्र व्यंकटेश कट्टी सराफ दुकानात सुमारे आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या बुरखाधारी महिलांच्या टोळीपैकी एका संशयित महिलेला गजाआड करण्यात शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे.
याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील रामवाडी गावातून संशयित राणी अजय गायकवाड या महिलेस जेरबंद करुन तिच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच अन्य चौघा संशयितांची नांवे निष्पन्न झाली असून, ते परागंदा असल्याची माहिती शहर पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी दिली.
सराफ पेठेत रामचंद्र व्यंकटेश कट्टी सराफ दुकानात गुरुवारी २७ मार्च रोजी पाच बुरखाधारी महिला व त्यांच्यासमवेत एक पुरूष इसम असे सहा जण चांदीचे पैंजण खरेदी करण्यासाठी आले. मुळातच दुकानाचा आकार लहान असल्याने या ग्राहकांमुळे गर्दी झाली. यातील एका महिलेला चांदीचे पैंजण दाखवण्यासाठी दुकानदार काउंटरमधून बाहेर येताच बुरखाधारी महिलेने कपाटातील सोन्याचे दागिने ठेवलेली बरणी लंपास केली. सुमारे आठ तोळे वजन्याच्या सोन्याच्या रिगा असा सुमारे चार लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला. याबाबत बद्रीनारायण बळवंत कट्टी (वय ४२, रा. ब्राम्हणपूरी, जिलेबी चौक, मिरज) यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. तपास कामी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक तपास व अभिलेखावरील संशयित चोरट्यांचा शोध घेतला. मिरज शहरातील सराफ पेठेत चोरी करणाऱ्या चोरट्यांची टोळी सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. यातील राणी गायकवाड हिला गजाआड केले. अन्य संशयीत परागंदा झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.