For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाकाने ‘खाणारी’ महिला

06:09 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
नाकाने ‘खाणारी’ महिला
Advertisement

अमेरिकेच्या व्हर्जिनीया प्रांतात वास्तव्य करणारी एक महिला सध्या तिच्या खाण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत आहे. कॅथरिन नामक ही महिला सर्वसामान्य माणसे घेतात, तसा तोंडाने आहार घेत नाही. तर ती नाकाने ‘खाते’. जर काही आजारामुळे किंवा शस्त्रक्रिया झाल्याने माणसे तोंडाने आहार घेऊ शकत नसतील, तर त्यांना नाकातून नळी पोटापर्यंत घालून या नळीतून द्रवपदार्थ दिले जातात. या महिलेला असे काहीही झालेले नाही. ती पूर्णपणे ठणठणीत आहे. तरीही ती, आहार घेण्यासाठी तोंडाचा उपयोग न करता नाकाचा करते, हे विशेष मानले जात आहे. तिच्या बॉयप्रेंडने जेव्हा तिची ही आहार घेण्याची पद्धत प्रथम पाहिली, तेव्हा त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला. या महिलेचे अशा प्रकारे आहार घेण्याचे कार्यक्रम अमेरिकेतील टीव्हीवरही झालेले आहेत. ही महिला असे का करते, त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. मात्र, त्याचा शोध आजवर लागलेला नाही. या महिलेला जणू नाकाने आहार घेण्याचे व्यसन लागले आहे, असे मानले जात आहे. तिच्या बालपणी ही महिला इतरांप्रमाणेच तोंडाने आहार घेत होती. पण महाविद्यालयात शिक्षण घेत असताना, तिने सहज म्हणून एक पेय नाकाने शोषून पाहिले. तिला तो अनुभव चांगला वाटला. तेव्हापासून तिला अशाच प्रकारे आहार घेण्याची सवय लागली आहे. अर्थात नाकाने घेण्यासाठी आहार द्रवस्वरुपातच असावा लागतो. घनस्वरुपातील पदार्थ किंवा घट्ट पदार्थ नाकाने खाता येणे शक्य नसते. त्यामुळे ही महिला प्रत्येक पदार्थाचे द्रवात रुपांतर करुन, नंतर नळीच्या साहाय्याने तो नाकाने ओढून पोटात घालते, असे पहावयास मिळते.

Advertisement

तिचा हा अद्भूत उपक्रम गेली पाच वर्षे सातत्याने चालला आहे. ती तिचे जवळपास सर्व भोजन प्रतिदिन अशा प्रकारे नाकानेच करत असते. द्रवात रुपांतर केलेले आम्लेट, पालक किंवा मश्रूम सूप, चहा, कॉफी आदी पदार्थ, इतकेच नव्हे, तर काही मसालेदर पदार्थही ती अशा प्रकारे द्रवरुप करुनच त्यांचा नाकाने आस्वाद घेते. खाण्याच्या अशा पद्धतीमुळे वाजवीपेक्षा जास्त आहार घेण्यापासून आपला बचाव होतो, असे तिचे म्हणणे आहे. तोंडाने आहार घेताना आपल्याला कित्येकदा आहाराच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवता येत नाही. कारण तोंडाने चावून खाणे सोपे असते. पण नाकाने आहार घेतल्याने तो केवळ योग्य तेवढाच घेतला जातो, असे या महिलेचे तर्कशास्त्र आहे. तिच्या या सवयीसंबंधी तिचे सहकारी किंवा तिचे कुटुंबिय आश्चर्य व्यक्त करतात. सर्वसामान्यांसाठीही हे अनोखे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.