नाकाने शीळ वाजविणारी महिला
कोणामध्ये कोणते कौशल्य दडलेले असते, हे सांगता येणे कठीण आहे. ज्या कृतींची आपण कल्पनाही करु शकणार नाही, त्या असे लोक लीलया करतात. आपण ज्याचा प्रयत्न करण्यासाही धजणार नाही, अशा बाबी ते सहजगत्या करुन दाखवितात, अशावेळी ‘हे प्रभो विभो, अगाध किती तव करणी’ ही एका अगदी जुन्या कवितेची ओळ अनेकांना स्मरल्याशिवाय रहात नाही.
कॅनडातील अंटोरिओ भागात राहणारी महिला लुलू लोटस लोटस हिला असेच एक कौशल्य अवगत आहे. ती चक्क नाकाने शीळ वाजविते. आपल्यापैकी कित्येकांना तोंडानेही शीळ व्यवस्थित वाजविता येत नाही. पण ही महिला नाकाने शीळ इतक्य सहजतेने वाजविते की पाहणारे आश्चर्याने तोंडात बोट घालतात. ती अशा प्रकारे शीळ घालून गाण्यांचे सूरही निर्माण करते. तिची शीळ 44.1 डेसिबल्स इतक्या मोठ्या ध्वनीकंपनीची असू शकते. ती सात वर्षांची असतानाच तिला आपल्या या कौशल्याचा शोध लागला होता. पुढे प्रयत्नपूर्वक तिने हे कौशल्य संवर्धित केले आणि आता तिला त्यामुळे जगप्रसिद्धी मिळाली आहे.
नाकातील मांसपेशींच्या विशिष्ट हालचालींच्या साहाय्याने ती हे करु शकते. या हालचाली बाहेरुन कोणालाही कळत नाहीत. तिला स्वत:लाही हे कसे घडते, हे नेमकेपणे सांगता येत नाही. अनेकांनी यावर संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या संशोधनाला मर्यादा पडतात. एकंदर, ही महिला सध्या गाजत आहे.