लग्नाच्या आमिषाने आर्थिक लुबाडणूक केल्याप्रकरणी संशयित महिलेस सशर्त जामीन
आरोपीतर्फे ॲड. स्वरुप पई व अंबरीश गावडे यांनी पाहिले काम
मालवण । प्रतिनिधी
मालवण दांडी येथील युवकाची लग्न करण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामधील संशयित श्रद्धा दीपक वालावलकर वय 27 वर्ष, रा. आरवली ता. वेंगुर्ला हिला मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी 15,000 रुपयांच्या मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीश गावडे यांनी काम पाहिले.याकामी फिर्यादी युवकाकडे संशयित महिलेने दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ पासून लग्न करायचे असल्याचे भासवून सारीका परब या नावाने मोबाईलवर संपर्क वाढविला व वेगवेगळी अडचणी आणि कारणे सांगून या कालावधीमध्ये युवकाकडून सुमारे रक्कम रुपये 1,63,000/- श्रद्धा वालावलकर या नावाच्या गूगल पे अकाउंट वर घेतले. त्यानंतर मात्र ही महिला लग्न करण्याचे टाळून वेगवेगळ्या सबबी सांगू लागली. त्यामुळे युवकास लुबाडणुक झाल्याचे लक्षात आल्याने युवकाने दि. 20/05/2025 रोजी मालवण पोलिस ठाण्यात सारीका परब व श्रद्धा वालावलकर यांचेविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून पैशांची लुबाडणूक केल्याची तक्रार दिल्याने मालवण पोलिसांनी भारतीय न्याय्य संहिता कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर मालवण पोलिसानी संशयीत श्रद्धा दीपक वालावलकर हिला दि. 22/06/2025 ला अटक केले. तपासामध्ये सारीका परब व श्रद्धा वालावलकर या दोन्ही एकच व्यक्ती असल्याचे व सदर महिला विवाहित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दि. 23/06/2025 रोजी संशयितेस मे. मालवण न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने तपासकामासाठी 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर संशयितेस दि. 26/06/2025 रोजी मालवण न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने संशयीत आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर केली.त्यानंतर संशयितातर्फे मे. न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. जामीन अर्जाच्या सुनावणीअंती मे. न्यायालयाने आरोपीस रक्कम रु. 15,000/- रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला.