मणिपूरमध्ये दहशतवाद्यांकडून महिलेची गोळ्या झाडून हत्या
वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूरच्या विष्णुपूर जिल्ह्यात शनिवारी भातशेतीत काम करणाऱ्या एका महिलेची संशयित पहाडी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेटन परिसरात ही घटना घडली. ही महिला इतर शेतकऱ्यांसोबत पिकांची काळजी घेत होती. शेतात काम करत असतानाच खालच्या भागात डोंगरावरून गोळीबार करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नव्याने घडलेल्या या घटनेनंतर पुन्हा एकदा येथील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मणिपूरमधील कुकी-मैतेई संघर्षाचे सत्र संपताना दिसत नाही. सशस्त्र दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढत हल्ले सुरूच ठेवले आहेत. यापूर्वी वांशिक संघर्षग्रस्त जिरीबाममधील आदिवासी गावातील रहिवाशांवर हल्ला करून सहा घरांना आग लावण्यात आली होती. ही घटना गुरुवारी मध्यरात्री जारोन हमर गावात घडली. दहशतवाद्यांच्या एका गटाने घरांना आग लावण्याचे हे कृत्य केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या हल्ल्यानंतर अनेक गावकरी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांनी जवळच्या जंगलात आश्र्रय घेतला.