पुरात वाहून गेल्याने महिला शास्त्रज्ञाचा मृत्यू
वडील अद्याप बेपत्ता : तेलंगणातील दुर्दैवी घटना
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणामधील युवा कृषी शास्त्रज्ञ डॉ. नुनावथ अश्विनी यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्यांचा मृतदेह हाती लागला असून त्यांचे वडील अद्याप बेपत्ता आहेत. डॉ. अश्विनी आणि त्यांचे वडील हे हैदराबाद विमानतळाकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. डॉ. अश्विनी या रायपूरमधील आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होत्या. त्या तेलंगणामधील खम्मम जिह्यातील सिंगरेनी मंडलमधील गंगाराम थांना गावच्या रहिवासी आहेत.
तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे बऱ्याच भागात पूर आला आहे. या पुरामध्ये डॉ. अश्विनी आणि त्यांचे वडील नुनावत मोतीलाल यांची कार वाहून गेली होती. दोघेही हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात असताना मरीपेडाजवळ आल्यानंतर त्यांची कार पुरामध्ये अडकली. नदीच्या पुलावर गेल्यानंतर डॉ. अश्विनी यांच्या कारमध्ये पाणी भरू लागले. त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. त्यानंतर बचाव पथकाने शोध मोहीम सुरू केली असता अकऊवागू पुलापाशी डॉ. अश्विनी यांचा मृतदेह सापडला. पण त्यांच्या वडिलांचा मृतदेह अद्याप सापडला नाही.