महिलेची 16 लाखांचा गंडा
महिलेसह तिघांनी दाखवले होते जादा परताव्याचे आमिष
कोल्हापूर
फायनान्स कंपनीमध्ये गुंतवणूकीवर प्रति महिना 10 टक्के परतावा देण्याच्या अमिषाने महिलेची 16 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. या प्रकरणी शोभा मच्छींद्र माने (रा. अहमदनगर), रामेश्वर ओंकार कुरळे (सावरगांव ता. आंबेजोगाई), रमेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद सुषमा सखाराम पाटील (वय 59 रा.नागाळा पार्क, महाविर गार्डन नजीक) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रिद्धीसिद्धी फायनान्स कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर 40 दिवसानंतर महिन्याला 10 टक्के परतावा देण्याची आकर्षक योजना 2022 मध्ये आणण्यात आली होती. याची माहिती सुषमा पाटील यांना मिळाली होती. यानुसार त्या कंपनीच्या महाबळेश्वर येथील सेमिनारला गेल्या होत्या. यानंतर त्यांनी शोभा माने, रमेश शिंदे, रामेश्वर कुरळे यांच्याशी संपर्क साधून फायनान्स कंपनीमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले.
यानंतर सुषमा पाटील यांनी 27 मे 2022 रोजी कंपनीच्या खात्यावर ऑनलाईन रक्कम पाठविली. डिसेंबर 2022 पर्यंत 16 लाख 65 हजार रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूकीची रक्कम सुषमा पाटील यांनी शोभा माने यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने पाठविली. यानंतर शोभा माने हीने सुषमा पाटील यांना 9 हजार रुपयांचा परतावा दिला. डिसेंबर 2022 नंतर मात्र माने हीने परतावा देणे बंद केले. यानंतर सुषमा पाटील यांनी गुंतविलेली रक्कम आणि परताव्याबाबत पाठपुरावा केला. मात्र शोभा माने यांनी परतावा न दिल्याने सुषमा पाटील यांनी याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली.