आंध्रप्रदेशात रेल्वेत चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार
मारहाण करत मोबाइल अन् रोकड लुटली
वृत्तसंस्था/ गुंटूर
आंध्रप्रदेशात एका धावत्या रेल्वेत महिलेवर बलात्कार झाला आहे. गुंटूर आणि पेद्दाकुरापाडू रेल्वेस्थानकादरम्यान धावणाऱ्या एका पॅसेंजर रेल्वेत हा प्रकार घडला आहे. राजामहेंद्रवरम येथे राहणारी महिला चारलापल्ली येथे जाण्यासाठी संतरागाछी स्पेशल रेल्वेतून प्रवास करत होती. याचदरम्यान रेल्वे गुंटूर रेल्वेस्थानकावर थांबली असता सुमारे 40 वर्षीय अज्ञात इसम डब्यानजीक आला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. या डब्यातून महिला एकटीच प्रवास करत होती.
हा महिलांसाठी राखीव डबा असल्याचे सांगत महिलेने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, तरीही तो इसम डब्यात शिरला आणि त्याने दरवाजा आतून बंद केला. रेल्वे गुंटूर आणि पेद्दाकुरापाडू रेल्वेस्थानकादरम्यान धावत असताना या इसमाने चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने महिलेला मारहाणही केली आणि तिच्याकडील 5600 रुपये आणि एक मोबाइल फोन लुटून नेला. रेल्वे पेद्दाकुरापाडू रेल्वेस्थानकानजीक पोहोचल्यावर आरोपीने उडी घेत पळ काढला.
तर या घटनेनतर महिलेने चरलापल्लीपर्यंत स्वत:चा प्रवास जारी ठेवला आणि कायदेशीर कारवाईच्या मागणीसठी सिकंदराबाद रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. रेल्वे पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर एक झिरो एफआयआर नोंदविला आहे. हे प्रकरण आंध्रप्रदेशच्या नादिकुडी पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात येणार आहे.