नाद येथे नेपाळी कामगाराकडून पत्नीचा खून
ऐन गणेशोत्सवातच घडलेल्या घटनेने देवगड तालुका हादरला
देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील नाद येथे एका नेपाळी कामगाराने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास घडली आहे. प्रेम बहादूर बिष्ट (३८, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. बेब्याचा सडा) असे संशयिताचे नाव असून त्याला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऐन गणेश चतुर्थी सणातच ही घटना घडल्याने देवगड तालुका हादरला आहे.उपलब्ध माहितीनुसार, नाद येथील बागायतदार यशवंत रमेश सावंत यांची 'बेब्याचा सडा' येथे कलम बाग असून या कलम बागेत संशयित प्रेम बिष्ट व त्याची पत्नी मजुरीचे काम करीत होते. बागेतील खोलीमध्ये संशयिताचे कुटुंब वास्तव्यास होते. २६ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास संशयित प्रेम बिष्ट याचा पत्नीशी वाद झाला. या वादात संशयित प्रेम बिष्ट याने लाकडी दांड्याने पत्नीला मारहाण करून तिचा खून केला.या घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ व त्यांची पोलीस टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. संशयितास पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास देवगड पोलीस करीत आहेत.