For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिकणे कुडणे येथे महिलेचा खून

05:12 PM May 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
चिकणे कुडणे येथे महिलेचा खून
Advertisement

घरातच बेदम मारहाणीने खून: संशयित मयत महिलेच्या मुलीचा बॉय फ्रेंड

Advertisement

डिचोली : डिचोली तालुक्यातील चिकणे कुडणे, साखळी येथे एका महिलेचा तिच्याच घरात बेदम मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. हा खुनाचा प्रकार करून संशयित युवक मयत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी व तिचा मोबाईल घेऊन पसार झालेला आहे. त्याच मोबाईलवरून त्याने या महिलेच्या मुलींना खुनाबाबत माहिती दिल्यानंतर घटना उघडकीस आली. याप्रकरणी डिचोली पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली असून फरार झालेल्या संशयिताला ताब्यात घेण्याचे आव्हान डिचोली पोलिसांसमोर आहे. ही घटना काल मंगळवार दि. 19 मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलिसस्थानकाच्या उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही., निरीक्षक विजय राणे व इतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

सावंतवाडीच्या सागरच्या शोधात पोलिस

Advertisement

प्रकरणाचा प्राथमिक अंदाज घेतल्यानंतर हे प्रकरण खून म्हणून नोंद करण्यात आले आहे. घटनास्थळावरून महिलेचा मोबाईल घेऊन पळ काढलेल्या संशयित सागर राऊळ या (राहणारा सावंतवाडी, महाराष्ट्र) याचा पोलिस शोध सुरू करण्यात आला आहे.

सागर हा मयत महिलेच्या मुलीचा मित्र

उपलब्ध माहितीनुसार, मयत शैला संजय घाडी (वय 55 वर्षे) ही महिला आपल्या तीन मुलांसह चिकणे कुडणे येथे राहत होती. या महिलेला दोन मोठ्या मुली व लहान मुलगा आहे. या महिलेला मारहाण करणारा सागर राऊळ हा तिच्या मुलीचा मित्र असल्याचे समजते.

सागर नियमितपणे घरात करायचा वाद

सागर राऊळ त्यांच्या घरात नियमितपणे ये जा करत होता. सागर व या घरातील मंडळी यांच्यात नियमित वाद व भांडणही व्हायचे. अशाच एका प्रकरणात सागरने त्यांच्या घराची खिडकी, आतील सामानांची नासधूस केली होती. त्याच्या विरोधात डिचोली पोलिसस्थानकात तक्रारही नोंद करण्यात आली होती.

मारहाणीमुळे झाला शैलाचा मृत्यू

सागर राऊळ हा काल मंगळवारी दुपारी शैला घाडी यांच्या घरी आला. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. यावेळी शैला व सागरमध्ये भांडण झाल्याचे समजते. याच भांडणावेळी सागर राऊळ याने शैला घाडी यांना बेदम मारहाण करून त्यांचे डोके जोरदारपणे भिंतीला आपटले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

शैलाच्या मोबाईलवरुनच स्वत: केला फोन

या कृत्यानंतर सागर राऊळ याने शैला यांच्या मोबाईल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. नंतर त्याच मोबाईलवरून शैला यांच्या मुलींना फोन करून आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली. त्यामुळे घरातील मंडळीला खुनाचा प्रकार समजला. डिचोली पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही., निरीक्षक विजय राणे, उपनिरीक्षक आकाश परवार, महिला उपनिरीक्षक अर्चना शर्मा व इतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती करून घेतली.

सदर प्रकरण पोलिसांनी खून म्हणून नोंद केली असून घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक पथक व श्वान पथकही दाखल झाले होते. या दोन्ही पथकांकडून याप्रकरणी आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची विविध माध्यमातून तपासणी पोलिसांकडून सुरूच होती. त्याचप्रमाणे हा खुनाचा प्रकार करून पसार झालेला सागर राऊळ हा मयत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीही घेऊन पळाल्याचेही अधिक चौकशीत समोर आले. या प्रकरणी फरार असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून पोलिस सर्व माध्यमांचा वापर करून बसून तपास करीत आहेत, असे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.