48 लाख खर्च करून महिलेचा स्वत:शीच विवाह
विवाहासाठी वधू-वर हवेत, ही बाब जगातील बहुतांश लोक मानतात. परंतु एका महिलेने या धारणेलाच आव्हान दिले आहे. तिने महागडा विवाहाचा ड्रेस खरेदी केला, हिऱ्याची अंगठी घेतली, सुंदर बीचवर सोहळा ठेवला आणि मग स्वत:सोबतच विवाह केला. या अनोख्या विवाहाकरता तिने जवळपास 48 लाख रुपये खर्च केले आहेत. आता तिची कहाणी जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
स्पेनच्या इबीजा येथे राहणारी 8 वर्षीय मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर बोनी लॉकेटने स्वत:सोबतच विवाह केला. हा निर्णय अनेकदा प्रेमात फसवणूक होणे आणि तुटलेल्या नात्यांमधून सावरल्यावर घेतल्याचे तिचे सांगणे आहे. बोनीची लवलाइफ अत्यंत समस्यांनी भरलेले राहिले. मी सातत्याने अशा नात्यांमध्ये राहिले ज्यात विश्वासघातच मिळाला. माझ्या पतीसोबत माझे 11 वर्षे जुने नाते हेते. दोघांनी 2023 मध्ये विवाह केला होता, परंतु विवाहाच्या केवळ 9 महिन्यांनी पती सुरुवातीपासून फसवणूककरत असल्याचे कळले होते. यामुळे मी त्वरित नाते संपुष्टात आणले. यानंतर ज्या दुसऱ्या व्यक्तीसोबत नाते जडले, त्यानेही फसवणूक केली, सातत्याने मिळालेल्या या झटक्यांमुळे मी मानसिक दृष्ट्या कोलमडून गेले होते असे बोनी सांगते.
आत्महत्येचा विचार
एका वेळी माझ्या मनात आत्महत्या करण्याचे विचार डोकावू लागले होते. सातत्याने तुटणारी नाती आणि एका निकटवर्तीयाच्या मृत्यूमुळे मी नैराश्यात सापडले होते. परंतु या अवघड काळात मित्र, थेरपी आणि पाळीव श्वानाने मला सावरण्यास मदत केली. आता हळूहळू मी स्वत:ला समजण्यास सुरवात केली आहे आणि आनंदासाठी इतरांवर निर्भर राहणे आवश्यक नसल्याची जाणीव झाल्याचे बोनीने म्हटले आहे.
स्वत:सोबत विवाहाचा विचार
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडिया पाहताना माझी नजर एका पिवळ्या हिऱ्याच्या अंगठीवर पडली. ही अंगठी मला अत्यंत पसंत पडली होती. याचमुळे मी ती सुमारे 23 लाख रुपयांमध्ये खरेदी केली. यानंतर मला जुना विवाहाचा ड्रेस अनेक वर्षांपासून सूटकेसमध्ये पडून होता. हा डिझाइनर ड्रेस सुमारे 17 लाख रुपयांमध्ये खरेदी केला होता. हाच ड्रेस परिधान करत स्वत:सोबत विवाह करण्याचा विचार तेव्हा मनात आला आणि जुन्या वाईट आठवणींना एक नव्या आणि सकारात्मक अनुभवात बदलण्याचा निर्णय घेतल्याचे बोनीचे सांगणे आहे.
बीचवर खास सोहळा
इबीजाने 30 मे रोजी काला डी हॉर्ट बीचवर स्वत:चा खास सोहळा आयोजित केला. यात केवळ 8 पाहुणे उपस्थित होते. एका अधिकाऱ्याने विवाहाची प्रक्रिया पूर्ण केली आणि बोनीने आरशात स्वत:ला पाहून स्वत:साठी वचनं घेतली. आज मी स्वत:ला निवडले आहे, सर्वप्रथम स्वत:वर प्रेम करणे आवश्यक असल्याचे मी शिकले आहे असे बोनीने म्हटले आहे. बोनीने स्वत:सोबत विवाह केला असला तरीही भविष्यात योग्य जोडीदार मिळाल्यास ती पुन्हा प्रेमात पडण्यास तयार आहे. हा विवाह कुठल्याही पुरुषाच्या विरोधात नव्हता, तर स्वत:बद्दल सन्मान अन् प्रेम व्यक्त करण्याचा प्रकार होता असे ती सांगते.
सोलोगॅमी म्हणजे काय?
स्वत:सोबत विवाह करण्याला ‘सोलोगॅमी“ म्हटले जाते. यात कुठलाच कायदेशीर विवाह नसतो आणि विवाहाशी निगडित कायदेशीर अधिकार मिळत नाही. हा केवळ एक प्रतिकात्मक सोहळा असतो, ज्यात व्यक्ती स्वत:बद्दल समर्पित राहतो.