महिलेने गमावले 32 कोटी रुपये
डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी 6 महिन्यांपासून लूट : बँक खात्यातून 187 वेळा व्यवहार
वृत्तसंस्था / बेंगळूर
बेंगळूरच्या एका महिलेने ‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीने 32 कोटी रुपये गमावल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. या महिलेला गेल्या सहा महिन्यांपासून डिजिटल अरेस्टची धमकी देण्यात येत होती आणि ही महिला त्या धमकीला बळी पडून आपल्या पैशाची लूट करून घेत होती. आपण सीबीआय अधिकारी आहोत. आम्ही तुमच्या प्रत्येक व्यवहारावर आणि हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले आहे, अशी बतावणी या महिलेकडे मोबाईल व्हिडिओ संदेशांद्वारे करण्यात येत होती. या धमकीला ही महिला बळी पडली, असे दिसून येत आहे.
ही महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याची माहिती देण्यात आली आहे. ती बेंगळूर येथे काम करते. तिला 14 सप्टेंबरपासून डिजिटल अरेस्टची धमकी देण्यात येत होती. प्रचंड हानी सोसल्यानंतर हा प्रकार असह्या झाल्याने या महिलेने अखेर पोलीस स्थानकात तक्रार सादर केली असून ती नोंद करून घेण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या काळात या महिलेने 187 वेळा बँक खात्यातून डिजिटल अरेस्ट गँगला पैसे हस्तांतरीत केल्याचा प्रकार उघड झाला असून चौकशी होत आहे.
प्रकरणाचा प्रारंभ कसा झाला ?
प्रथम सहा महिन्यांपूर्वी या महिलेला ‘डीएलएच’ कंपनीच्या नावे एक कॉल आला. आपल्या नावाचे एक पार्सल आमच्या कार्यालयात आले असून त्या तीन क्रेडिट कार्डस्, चार पासपोर्टस् आणि निर्बंधीत एमडीएमए अशा वस्तू आहेत. हे पार्सल कंपनीच्या अंधेरी येथील कार्यालयात आले आहे, असा संदेश तिला देण्यात आला. या पार्सलशी आपला काहीही संबंध नाही, असे तिने प्रथम स्पष्ट केले. तथापि, या पार्सलशी तुमचा फोन क्रमांक जोडला गेला आहे. सीबीआय याची चौकशी करत आहे. तुम्ही सापडलात तर तुम्हाला कारागृहात जावे लागेल, अशी धमकी देण्यात आली. तसेच एका बनावट सीबीआय अधिकाऱ्यांकडून फोनही तिला करण्यात आला. त्यामुळे या महिलेने घाबरुन, त्या व्यक्तीच्या सूचनेनुसार त्याने दिलेल्या क्रमांकाच्या खात्यावर पैसे हस्तांतरीत केले. नंतर हा प्रकार वारंवार होऊ लागला. पोलिसांकडे गेल्यास त्वरित तुम्हाला अटक केली जाईल, अशीही धमकी देण्यात आली. अशा प्रकारे या महिलेने सहा महिन्यांमध्ये 32 कोटी रुपये गमावल्याचे तिने तक्रारीत स्पष्ट केले, सायबर विभागाकडून चौकशी होत आहे.
स्कायपी आयडीची धमकी
या महिलेला मे 2025 मध्ये दोन स्कायपी आयडी इन्स्टॉल करण्याचा आदेश देण्यात आला. तसेच हा प्लॅटफॉर्म बंद होईपर्यंत सातत्याने व्हिडिओ कॉलवर राहण्याची धमकी देण्यात आली. मोहित हांडा नामक बनावट अधिकाऱ्याने या काळात तिच्याशी दोन दिवस सतत संवाद साधला. त्यानंतर राहुल यादव या बनावट अधिकाऱ्याने तिच्यावर एक आठवडा लक्ष ठेवले. नंतर प्रदीप सिंग नामक बनावट सीबीआय ज्येष्ठ अधिकाऱ्याने तिला तिचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याचा आदेश दिला. अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल, अशी धमकीही दिली गेली.
आर्थिक माहिती दिली
या महिलेवर या सर्व प्रकारचा ताण असह्या होऊन तिने या घोटाळेबाजांसमोर शरणागती पत्करली आणि आपली सर्व आर्थिक माहिती त्यांच्यासमोर उघड केली. त्यानंतर ही महिला पूर्णपणे या घोटाळेबाजांच्या तावडीत सापडली आणि ते म्हणतील त्याप्रमाणे त्यांना पैसे हस्तांतरीत करू लागली. हा प्रकार चार महिने चालला. आपल्या मुलाचे लग्न झाल्यानंतर या महिलेने तक्रार सादर केली.
सर्वांसाठी धडा
हे प्रकरण सर्वांसाठी धडा देणारे आहे. डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकारच नसतो. त्याला कोणतीही कायदेशीर मान्यता नाही. हे वारंवार स्पष्ट केले जात असूनही अनेक माणसे याला फशी पडत आहेत. तसेच प्रचंड पैसा गमावत आहेत. कोणीही अशा प्रकारच्या डिजिटल अरेस्टच्या धमक्यांना बळी पडू नये. अशा तऱ्हेचा कोणताही कॉल आल्यास पोलिसांना त्याची माहिती द्यावी. तसेच त्वरित तक्रार सादर करावी. एकदा पैसे गेल्यानंतर ते परत मिळविणे आणि घोटाळेबाजांना शोधणे जवळपास अशक्य असते. त्यामुळे मुळात ही वेळ स्वत:वर येऊच देऊ नये, असे अनेक तज्ञांनी स्पष्ट केले आहे. डिजिटल अरेस्ट हा केवळ एक घोटाळा किंवा फ्रॉड असतो. धमकीला बळी पडू नका, असे सरकारनेही वारंवार स्पष्ट केले आहे.
डिजिटल अरेस्ट हा प्रकारच बनावट
ड डिजिटल अरेस्ट हा प्रकारच बनावट असून तो एक मोठा घोटाळा आहे
ड डिजिटल अरेस्टचा कॉल आल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे
ड अशा घोटाळेबाजांना आपली आर्थिक, व्यक्तिगत माहिती कधीच देऊ नये