अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार
सौंदलगानजीकची घटना : मृत महिला इंगळी येथील रहिवासी
प्रतिनिधी/ निपाणी
महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास वेदगंगा नदीनजीक सौंदलगा हद्दीत घडली. अमिना अकबर कडगावकर (वय 44, रा. इंगळी हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत निपाणी ग्रामीण पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, दुचाकीवरून मृत महिला अमिना व तिचा मुलगा राज अकबर कडगावकर हे दोघेजण कागलहून आजऱ्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, महामार्गावर वेदगंगा नदीनजीक सौंदलगा हद्दीत आले असता राज याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दोघेही खाली जोरात कोसळले. त्याच दरम्यान भरधाव अज्ञात वाहनाने अमिना यांना जोराची धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या. जखमी राजला अधिक उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आले.
त्यानंतर निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, हवालदार एस. एस. चिकोडे, प्रभू सिद्धांतगीमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. महात्मा गांधी रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेसंदर्भात आयेशा रफिक मकुबाई यांनी फिर्याद दिली आहे.