For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोयत्याच्या हल्ल्यात ओवळीयेतील महिलेचा मृत्यू

08:45 PM Mar 29, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कोयत्याच्या हल्ल्यात ओवळीयेतील महिलेचा मृत्यू
Advertisement

संशयित पिता–पुत्र ताब्यात

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडी  तालुक्यातील ओवळीये गावातील मधलीवाडी येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादाने अखेर हिंसक वळण घेत, कोयत्याने केलेल्या हल्ल्यात 65 वर्षीय सरस्वती सावंत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित विजय कृष्णा सावंत (वय 61) आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत (वय 37) या पिता–पुत्रांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. सावंतवाडीपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या ओवळीये गावातील मधलीवाडी येथे सावंत कुटुंबातील दोन गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. हा वाद अनेकदा उफाळून आला होता, मात्र यावेळी त्याने थेट जीवघेणे रूप घेतले.मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सरस्वती सावंत या आपल्या मुलगा एकनाथ सावंत याच्यासोबत घरालगतच्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी शेजारी राहणारे विजय सावंत आणि त्यांचा मुलगा रघुनाथ सावंत हे तेथे आले. “तुम्ही आमच्या जमिनीत काय करता?” असा सवाल करत त्यांनी वादाला सुरुवात केली. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र काही क्षणांतच हा वाद तीव्र झाला.प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वाद वाढताच विजय सावंत आणि रघुनाथ सावंत यांनी सोबत आणलेला कोयता काढला आणि सरस्वती सावंत यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.आईवर झालेला जीवघेणा हल्ला पाहून मुलगा एकनाथ सावंत हादरून गेला. त्याने तत्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही विलंब न करता 108 आपत्कालीन रुग्णवाहिकेला कळवले आणि घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सरस्वती सावंत यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याआधीच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, मृत सरस्वती सावंत यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या जीवाला विजय सावंत आणि रघुनाथ सावंत यांच्याकडून धोका असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, त्यानंतरही हा भीषण प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ओवळीये गावात जाऊन संशयित विजय सावंत आणि रघुनाथ सावंत यांना ताब्यात घेतले आणि सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी सरस्वती सावंत यांचा मुलगा एकनाथ सावंत यांनी दोघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, हल्ल्यामागील नेमके कारण, पूर्वीचे वाद आणि तक्रारींची पार्श्वभूमी यांचा सखोल तपास केला जात आहे. तसेच, या घटनेत वापरण्यात आलेला कोयता जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.