खुनी हल्ल्यातील महिलेचा अखेर मृत्यू
कराड :
विवाहित महिलेवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना आगाशिवनगर येथे गत आठवड्यात गुरूवारी सायंकाळी घडली होती. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेची चार दिवस मृत्युशी झुंज सुरू होती. अखेर रविवारी रात्री ‘त्या’ महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही महिला गुढे (ता. पाटण) येथील असून सध्या दांगट वस्ती, आगाशिवनगर येथे राहात होती.
दरम्यान रवींद्र सुभाष पवार (वय 32, रा. आगाशिवनगर, ता. कराड) या संशयित हल्लेखोरावर सोमवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिला गुरूवारी दुपारी कामानिमित्त आगाशिवनगर येथील घरातून बाहेर पडली होती. मलकापूर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रासमोरील चौकात संशयिताने कोयत्याने महिलेवर वार केला. कोयत्याने दोन खोलवर वार झाल्याने महिला रक्ताच्या थारोळ्यात कोसळली होती. हल्ल्यानंतर संशयित हल्लेखोर पसार झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. विवाहित महिलेवर झालेल्या गंभीर हल्ल्याने खळबळ उडाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्या पथकाने संशयिताला वहागाव ते वराडे दरम्यान उड्डाणपुलाखाली पकडले. जखमी महिलेवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू होते. अतिरक्तस्त्राव झाल्याने महिलेची प्रकृती चिंताजनक बनत चालली होती. सलग चार दिवस तिने मृत्युशी झुंज दिली. अखेर रविवारी रात्री तिची झुंज संपली.
महिलेच्या मृत्यूनंतर संशयितावर तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहितेच्या मृत्यूने तिच्या तीन मुलांवरील मायेचे छत्र हरपले. सोमवारी सकाळी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या वेणुताई चव्हाण रूग्णालयात नेण्यात आला. यानंतर गुढे येथे मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.