राष्ट्रीय महामार्गावर अपघातात हुबळीच्या महिलेचा मृत्यू
पतीसह मुलगी जखमी : हिरेबागेवाडी पोलिसात एफआयआर
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
भरधाव कारची समोरून जाणाऱ्या आणखी एका कारला धडक बसून पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मुत्नाळजवळ रविवारी रात्री झालेल्या अपघातात हुबळी येथील एका महिलेचा मृत्यू झाला तर कारमधील पती व मुलगी जखमी झाली. या अपघातानंतर पाठीमागच्या कारने पेट घेतला.
एकता रणजित मेहता (वय 51) राहणार शांती कॉलनी, विश्वेश्वरनगर, हुबळी असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पती रणजित मेहता (वय 54) व मुलगी अचल हे जखमी झाले आहेत. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
रणजित मेहता हे आपली पत्नी एकता व मुलगी अचल यांच्यासमवेत कारमधून हुबळीला जात होते. मुत्नाळजवळ आणखी एका कारने पाठीमागून रणजित यांच्या कारला धडक दिल्यामुळे एकता यांच्या डोक्याला व छातीला दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी इस्पितळात हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता एकता यांचा मृत्यू झाला. सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. समोरून जाणाऱ्या कारला धडक दिल्यानंतर पाठीमागच्या कारने पेट घेतल्याचीही घटना घडली. प्रसंगावधान राखून चालक कारमधून बाहेर पडला.