Kolhapur : नरंदे येथे कर्जाला कंटाळून महिलेची आत्महत्या
विहिरीत उडी मारून ४२ वर्षीय महिलेची आत्महत्या
हातकणंगले : नरंदे (ता. हातकणंगले ) येथील महिलेने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. की, कमल विलास ढेरे (वय ४२) असे मृताचे नाव आहे. आधिक माहिती अशी हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील कमल विलास ढेरे या पती व मुलांसह नरंदे येथे राहत होत्या. त्यांचे सासर रुकडी होते. पण त्या कुटुंबासह नरंदे येथे माहेरी राहत होत्या. त्यांचे पती विलास ढेरे बैलगाडी शर्यतीमध्ये अपघात झाल्याने गेल्या दहा-बारा वर्षांपासून घरी झोपूनच होते.
त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे लग्न आणि पतीचा औषधोपचार यासाठी कमल यांनी कर्ज काढले होते. कुटुंबाचा सर्व भार त्यांच्यावर असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक ओढाताण होत होती. कर्ज बसुलीसाठी तगादाही लागला होता. रविवारी सायंकाळी सात वाजता त्या घरी कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या.
त्या राहत असलेल्या शेता शेजारीच गजानन अनुसे यांच्या विहिरीमध्ये त्यांनी उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रात्री दहा वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सदानंद पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. घटनेची नोंद रात्री उशिरा हातकणंगले पोलिसात झाली आहे.