अपहरणाच्या संशयाने महिलेला मारहाण
न्यू गांधीनगर येथील घटना : व्हायरल ऑडिओमुळे संशयात भर, महिला रस्त्यावर
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावात लहान मुलांचे अपहरण करणाऱ्यांची टोळी वावरत आहे. कॅम्प परिसरात या टोळीने एका मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न केला आहे, असा एक ऑडिओ गेल्या दोन आठवड्यांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे शहर व उपनगरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शनिवारी सकाळी गांधीनगर परिसरात मुलांच्या अपहरणाच्या संशयाने जमावाने एका महिलेला बेदम मारहाण केली.
सुमारे 29 वर्षीय महिला गांधीनगर परिसरात भिक्षा मागण्यासाठी गेली होती. ही महिला लहान मुलांना अपहरण करण्यासाठी आली आहे, या संशयाने तिला मारहाण करण्यात आली. शनिवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12 यावेळेत ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर, उपनिरीक्षक होनप्पा तलवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
जमावाच्या तावडीतून महिलेची सुटका करून पोलिसांनी तिला पोलीस चौकीत ठेवले. नंतर सुरक्षितपणे तिला माळमारुती पोलीस स्थानकात हलविण्यात आले. पोलिसांनी जमाव पांगवला. मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत तिला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस वेळेत पोहोचले नसते तर तिला आणखी मारहाण झाली असती. या घटनेनंतर शहर व उपनगरात अफवांना ऊत आला होता. रमजानच्या महिन्यात मुस्लीम बांधव दानधर्म करतात. या काळात धान्य व इतर वस्तू दान स्वरुपात दिल्या जातात. यासाठी ही महिला बुरखा घालून भिक्षा मागण्यासाठी न्यू गांधीनगर परिसरात आली होती. गैरसमजुतीने मुलांचे अपहरण करण्यासाठी आली आहे, असा आरोप करीत या महिलेला मारहाण करण्यात आली आहे.
तिच्या हातात वस्तू व धान्य गोळा करण्यासाठी पिशवी होती. ही पिशवी तिने लहान मुलांना कोंबण्यासाठी आणली आहे, असे सांगत तिला मारहाण करण्यात आले. जमावातील महिलांनी आपल्या मुलांना संरक्षण द्या, अशी मागणी केली. ही महिला लहान मुलांना ओढून नेत होती. त्यामुळे तिला आडवून मारहाण केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी चौकशी सुरू होती. आपण मुलांच्या अपहरणासाठी नाहीतर भिक्षा मागण्यासाठी आले होते, असे त्या महिलेने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नये...
पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे
या घटनेसंबंधी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सोशल मीडियावर लहान मुलांच्या अपहरणासंबंधी एक ऑडिओ व्हायरल होत आहे. या ऑडिओमुळे अफवांना ऊत आला आहे. कॅम्प परिसरात अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा त्या ऑडिओत उल्लेख आहे. त्यामुळे आम्ही ऑडिओत उल्लेख असलेल्या ठिकाणी कॅम्प पोलिसांकडून पाहणी केली आहे. मात्र बेळगावात तसे काहीच घडले नाही. गांधीनगर येथे भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या महिलेला मुलांच्या अपहरणासाठी आली आहे, असे सांगत संशयाने तिला मारहाण करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रकार आढळून आल्यास 112 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, क्षणार्धात पोलीस पोहोचतील. कोणीही कायदा हातात घेऊ नये. गेल्या दोन महिन्यांत बेळगावात लहान मुलांच्या अपहरणाची एकही घटना घडली नाही. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे.