For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरात घुसून म्हणाला... ‘माझ्या पत्नीला फोन कर’, मोबाईल घेण्यासाठी महिला उठताच खुरप्याने केली मारहाण

02:39 PM Sep 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
घरात घुसून म्हणाला    ‘माझ्या पत्नीला फोन कर’  मोबाईल घेण्यासाठी महिला उठताच खुरप्याने केली मारहाण
Advertisement

तासगाव : तासगाव तालुक्यातील निमणी येथे घरात घुसून एका महिलेवर खुरप्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ‘माझ्या पत्नीला फोन कर’ असे म्हणत घरात शिरलेल्या व्यक्तीने महिलेच्या डोक्यात तसेच हात, मनगट आणि पाठीवर खुरप्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल संतोष हिप्परगी (वय ३५, रा. दुधारकर मळा, निमणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार शंकर जाधव (रा. नेहरूनगर, पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल हिप्परगी आणि शंकर जाधव यांच्या पत्नी लक्ष्मी या दोघी एका कोल्ड स्टोअरेजमध्ये काम करतात. शुक्रवारी (१८ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे सात वाजता मंगल या कामावरून घरी परतल्या. त्या घरात स्वयंपाक करीत असताना त्यांची मुले अभ्यास करीत होती. त्यांचे पती मात्र कामावरून अद्याप घरी आले नव्हते.

दरम्यान, रात्री सुमारे आठच्या सुमारास शंकर जाधव अचानक त्यांच्या घरात शिरले. त्यांनी मंगल यांच्याकडे ‘माझी पत्नी लक्ष्मीला फोन कर’ अशी मागणी केली. मंगल या मोबाईल घेण्यासाठी उठल्या असता, जाधव यांनी हातातील खुरप्याने त्यांच्या डोक्यात वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

यानंतर मंगल यांनी आरडाओरडा केल्याने आरोपीने त्यांच्या डाव्या मनगटावर, डाव्या दंडावर, उजव्या हातावर आणि पाठीवरही खुरप्याने मारहाण केली. हल्ल्यात जखमी झालेल्या मंगल यांनी आरडाओरड करत घराबाहेर पळ काढला.

या घटनेनंतर मंगल हिप्परगी यांनी तासगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शंकर जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास तासगाव पोलिस करीत आहेत.

Advertisement
Tags :

.