सावंतवाडी बसस्थानकात महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी; जालना जिल्ह्यातील सराईत महिला आरोपीला आठ दिवसांत अटक
सावंतवाडी : सावंतवाडी बसस्थानकात एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशाच्या पिशवीतील सुमारे १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या जालना जिल्ह्यातील एका महिलेला अटक करण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित महिलेला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव संगीता सुभाष जाधव (३५, रा. मंठा, जि. जालना) असे आहे. तिच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
गर्दीचा फायदा घेत दागिने लंपास
२१ सप्टेंबर रोजी फिर्यादी महिला सावंतवाडीहून पणजीकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवास करण्यासाठी बसस्थानकातून बसमध्ये चढत होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने तिच्या काखेतील पिशवीत ठेवलेली सोन्याच्या दागिन्यांची कापडी पिशवी लंपास केली.
बस सुरू झाल्यानंतर काही वेळाने दागिने चोरीला गेल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध
गुन्ह्याची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संबंधित बसजवळ एका महिलेच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या.
यानंतर सीसीटीव्ही चित्रणासोबत तांत्रिक तपास आणि उपलब्ध नोंदींच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला. तपासादरम्यान संशयित महिला ही जालना जिल्ह्यातील सराईत आरोपी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
मंठ्यात सापळा रचून अटक
तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करत २९ सप्टेंबर २०२६ रोजी मंठा, जि. जालना येथे सापळा रचून संगीता जाधव हिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
चोरीतील सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे आणि सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलिस हवालदार जॅक्सन घोन्सालवीस, पोलिस कर्मचारी अमर कांडर तसेच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षद हिंगे, उपनिरीक्षक अविनाश पाटील, पोलिस हवालदार दीपक शिंदे आणि महिला पोलिस कर्मचारी गावकर यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
दरम्यान, आरोपी महिलेविरुद्ध सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, चोरीला गेलेला मुद्देमाल नेमका कुठे आहे आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याबाबत पोलिस तपास सुरू आहे.