वोल्वार्डची अग्रस्थानी झेप, जेमिमा टॉप टेनमध्ये
आयसीसी महिला वनडे मानांकनात स्मृती मानधनाची अल्पशी घसरण
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने महिलांचे नवे वनडे मानांकन जाहीर केले असून नुकत्याच झालेल्या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंचा बढती मिळण्यासाठी फायदा झाला आहे, त्यात दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड, भारताची जेमिमा रॉड्रिग्स यांचा समावेश आहे. मागील वेळी अग्रस्थानावर असणाऱ्या स्मृती मानधनाची मात्र एका स्थानाने घसरण झाली असून वोल्वार्डने तिचे अग्रस्थान घेतले आहे.
द.आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने दोन स्थानांची प्रगती करीत पहिले स्थान पटकावले आहे. तिने उपांत्य व अंतिम सामन्यात शानदात शतके नेंदवत स्मृतीला मागे टाकले. या स्पर्धेत तिने एकूण 571 धावा जमविल्या. तिने कारकिर्दीतील सर्वोच्च 814 मानांकन गुण मिळविले आहे. जेमिमा रॉड्रिग्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या उपांत्य लढतीत चमकदार नाबाद 127 धावा फटकावत भारताला अंतिम फेरी गाठून देण्याची मोलाची भूमिका बजावली होती. तिने आता टॉप टेनमध्ये पहिल्यांदाच स्थान मिळविले असून नऊ स्थानांची प्रगती करीत ती आता दहाव्या स्थानावर पोहोचली आहे. फोबे लिचफील्डने याच सामन्यात शतकी खेळी केल्याने तिने क्रमवारीत एकूण 13 स्थानांची उडी घेत 13 वे स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाची एलीस पेरी व न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन या दोघीही सातव्या स्थानावर असून सोफीने वनडेमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनेही चार स्थानांची प्रगती केल्यानंतर 14 वे स्थान घेतल आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत बरीच हालचाल झाली असून द.आफ्रिकेच्या मेरिझॅन कॅपने अग्रस्थानावरील सोफी एक्लेस्टोनच्या अगदी जवळ पोहोचली आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तिने 20 धावांत 5 बळी मिळविल्याने तिने दोन स्थानांची प्रगती केली असून तिचे 712 मानांकन गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँड (सहावे स्थान), किम गार्थ (सातवे) यांनीही एकेक स्थानांची प्रगती केली आहे.
वर्ल्ड कपमध्ये स्पर्धावीरची मानकरी ठरलेली भारताची दीप्ती शर्मा आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली. तिने उपांत्य व अंतिम सामन्यात मिळून 7 बळी व 82 धावा केल्या. या कामगिरीमुळे अष्टपैलूंच्या क्रमवारीत तिने एका स्थानाची प्रगती करताना सदरलँडला (388 गुण) मागे टाकत चौथे स्थान पटकावले.