For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

साक्षी मी प्रकृती-द्वारा उभारी चराचर

06:23 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
साक्षी मी प्रकृती द्वारा उभारी चराचर
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

भूतसृष्टीच्या निर्मितीसाठी किंवा ती मायेत विलीन करण्यासाठी भगवंतांना काहीएक कष्ट करावे लागत नाहीत. तसेच मायेची निर्मिती करणे हा तर त्यांच्या हातचा मळ आहे. म्हणून साधूसंत जगाकडे भगवंतांची एक लीला म्हणून पाहतात. विश्वाची निर्मिती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही अवस्थांना माया जबाबदार असते. त्यामुळे ह्या तिन्हीचे कर्तृत्व मायेकडे जाते. मायेची निर्मिती जरी भगवंतांनी केलेली असली तरी मायेने निर्माण केलेल्या विश्वाला ते कारणीभूत नसतात. पर्वताच्या पोटातील पदार्थ जसा पावसाच्या धारांनी झोडला जात नाही त्याप्रमाणे प्रकृतीचे कर्म मला बांधू शकत नाही. एखाद्या उदास पुरुषाप्रमाणे मी स्वत: काही करीत नाही अथवा दुसऱ्याकडून काही करवत नाही. घरात ठेवलेला दिवा कोणाला तू अमूक एक काम कर असा नियम घालून देत नाही. अथवा, कोणी काम करत असेल तर त्याचे निवारण करत नाही, आणि घरामध्ये कोण काय काम करत आहे हेही पहात नाही. ज्याप्रमाणे तो दिवा घरात तटस्थ असून घरातील सर्व घडामोडी घडण्याला कारणीभूत होतो त्याप्रमाणे सर्व भूतांमध्ये मी असलो तरी ते काय करत आहेत, चुकीचे करतायत की बरोबर करतायत, सारासार विचार करून कर्म करतायत की मनाला येईल तसे वागतायत ह्याच्याशी मला काहीच देणेघेणे नसल्याने त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मांबाबत मी उदासीन किंवा तटस्थ असतो.

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, माझा आश्रय मिळाला असताना माया चराचर जगत् निर्माण करते व ठराविक कालावधी लोटला की, त्याचा नाश होतो. ह्या सगळ्यात माझा कोणताही सहभाग नसल्याने मी केवळ ह्या घटनेचा साक्षी असतो.

Advertisement

साक्षी मी प्रकृती-द्वारा उभारी चराचर। त्यामुळे सर्व सृष्टीची ही घडामोड होतसे ।। 10।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, जगाच्या निर्मितीची कल्पना भगवंत स्पष्ट करून सांगत आहेत. ते म्हणाले, दिवस उजाडला की, लोकांचे व्यवहार सुरु होतात त्यामुळे लोकांच्या सर्व व्यापाराला सूर्य जसा निमित्तमात्र होतो, त्याप्रमाणे मी मायेचा अंगीकार केला आणि तिच्यापासून चराचरांची उत्पत्ती होते म्हणून चराचरांच्या उत्पत्तीला मी निमित्त आहे, असे म्हणता येईल. आता या विचाराच्या प्रकाशात तू माझा ऐश्वर्ययोग चांगला न्याहाळून पहा. मी मायेची निर्मिती केली आणि सर्व प्राणीमात्र तिच्याकडून निर्माण केले गेले म्हणून असे म्हणता येईल की, ते माझ्यात होते. असे जरी असले तरी मी प्राण्यांमध्ये नसतो. माया भूतांची निर्मिती करते म्हणजे माझा त्याच्याशी काही सबंध नसल्याने ते माझ्यात नाहीत मी त्यांच्यात नाही. थोडक्यात दोन्ही दृष्टीने विचार केला तर मी प्राण्यात नसतो ही गोष्ट सत्य आहे. हे माझे श्रेष्ठ गुपित आहे परंतु तुला ते उघड करून सांगितले. आता इंद्रियांवर संयम करून त्यांना स्वत:च्या ताब्यात ठेव आणि बाह्य गोष्टींकडे दुर्लक्ष करून अंतर्मुख हो आणि मी सांगितलेल्या गुह्य विचारांचा अनुभव घे. अर्जुना, हे वर्म जोपर्यंत स्वाधीन होणार नाही, तोपर्यंत माझी स्वरूपस्थिती मुळीच अनुभवास येणार नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.