इथेनॉल नसते तर पेट्रोल 125 रुपये
केंद्र सरकारचे प्रतिपादन, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग, पण मिश्रणामुळे फटका कमी
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यात येत नसते, तर पेट्रोल 125 रुपये लीटर दराने विकावे लागले असते, असे प्रतिपादन केंद्र सरकारने केले आहे. सध्या इथेनॉल मिश्रणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. इथेनॉलमुळे कार्सची इंजिने बिघडतात, असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली.
मध्यपूर्वेत अमेरिका आणि इराण संघर्ष भडकल्याने कच्च्या तेलाचे दर अस्थिर झाले आहेत. दरात सरासरी दीडपटीहून अधिक वाढ झाली आहे. अशा आव्हानात्मक स्थितीत देशातल्या इथेनॉल उत्पादनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची बचत झाली आहे. कच्च्या तेलाची आयात नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे आणि भारतातील शेतकऱ्यांनाही कृषीउत्पादनाचे एक साधन प्राप्त होऊन त्यांचा लाभ झाला आहे. या सर्व मुद्द्यांचा सांगोपांग विचार करुनच इथेनॉल मिश्रणाचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अभ्यासपूर्वक घेण्यात आला असून त्याचा हेतू अर्थव्यवस्थेवर अधिक दडपण येऊ नये, हाच आहे. या निर्णयाला प्रतिसादही मिळत आहे, असे स्पष्टीकरण केंद्राने केले आहे.
30 रुपयांची बचत
अमेरिका आणि इराण यांच्या संघर्षाच्या ऐन मध्यावर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर 120 डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत पोहचले होते. एप्रिल आणि मेमध्ये सरासरी दर 105 डॉलर्स होते. अशावेळी इथेनॉल नसते, तर पेट्रोलचे दर 125 रुपयांपर्यंत वाढले असते. राज्य सरकारांचा मूल्यवर्धित कर लागल्यानंतर कदाचित किंमत आणखी अधिक झाली असती. मात्र, या अत्यंत अडचणीच्या वेळी इथेनॉल मिश्रणामुळे दर प्रतिलीटर जवळपास 30 रुपये कमी राहू शकले. मध्यमवर्गिय कुटुंबांची तेव्हढी बचत झाली. याचा विचारही इथेनॉलच्या मिश्रणाला विरोध करणाऱ्यांनी करावयास हवा, असे म्हणणे केंद्र सरकारने शनिवारी मांडले.
इंडियन बास्केटचा दर अधिक
कच्च्या इंधन तेलाच्या इंडियन बास्केटचा दर तर याहूनही अधिक होता. युद्धाच्या ऐन भरात तो 135 डॉलर्स प्रतिबॅरल पर्यंत पोहचला होता. त्यावेळीही भारतात पेट्रोलचा दर 100 रुपये प्रतिलीटरच्या आसपास राहिला. कारण या पेट्रोलचा 20 टक्के भाग इथेनॉलच्या माध्यमातून आलेला आणि स्वदेशी उत्पादनाचा होता. म्हणून भारतात पेट्रोलचे दर अन्य देशांच्या तुलनेत बरेच कमी ठेवणे शक्य झाले. अनेक समृद्ध देशांनाही त्या काळात पेट्रोलच्या दरात जवळपास दुप्पट वाढ करावी लागली होती. पण भारतात दर खूपच स्थिर राहिले होते. त्यामुळे इथेनॉलचे मिश्रण देशासाठी किती दिलासादायक होते, त्याचा विचार आवश्यक आहे, असे पेट्रोलियम विभागाच्या वक्तव्यात स्पष्ट करण्यात आले.
नेमकी किती बचत
पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण केल्यामुळे नेमकी किती बचत झाली, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. पेट्रोलियम विभागाने ही आकडेवारी घोषित केली असून युद्धकाळात एकंदर बचत 1 लाख 97 हजार कोटी रुपयांची झाली. तसेच 3.16 लाख कोटी रुपयांची आयातीत बचत झाली. इथेनॉलच्या मिश्रणामुळे वायूप्रदूषणाचे प्रमाणही कमी ठेवण्यात यश मिळाले. वायुमंडलात कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जनही कमी प्रमाणात झाले, असे अनेक परिणाम स्पष्ट केले गेले. इतकेच नव्हे, तर भारतातील कष्टकरे शेतकरी आणि इथेनॉल निर्मिती केंद्रे यांना 1.66 लाख कोटी रुपयांचे उत्पादन मूल्य मिळाले. कार्सचे इंजिन बिघडल्याच्या तक्रारी अत्यल्प प्रमाणात आहेत. ज्या आहेत, त्यांचा विचार केला जात आहे. समस्येवर तोडगा काढला जाईल. नव्या गाड्यांना इथेनॉलची समस्या येत नाही. ती काही जुन्या गाड्यांनाच येते, अशीही मांडणी केंद्र सरकारच्या वतीने केली गेली.
इथेनॉल मिश्रणाचे लाभ
ड 1.97 लाख कोटी रुपये : केंद्र सरकारच्या परकीय चलनाची बचत
ड 1.66 लाख कोटी रुपये : थेट शेतकरी आणि उत्पादकांचा झाला लाभ
ड 3 कोटी 16 लाख : इथेनॉलमुळे पेट्रोलच्या झालेल्या बचतीचे प्रमाण
ड 0.1 टक्के : इथेनॉल मिश्रणाने खराब झालेल्या कार्सची अनुमानित संख्या
