सैन्यमाघार पूर्ण, गस्त घालण्यास प्रारंभ
लडाख सीमेवर भारत-चीन सैनिकांनी परस्परांना दिली मिठाई : तणाव निवळण्याची शक्यता
वृत्तसंस्था/लडाख, नवी दिल्ली
लडाख सीमेवर भारत आणि चीन यांनी सेनामाघारीची कार्यवाही पूर्ण केली आहे. त्याचप्रमाणे 2020 मधील गस्तक्षेत्रात गस्त घालण्यासही प्रारंभ केला आहे. दीपावली उत्सवाच्या प्रथम दिनी दोन्ही देशांमधील लडाख सीमेवरचा तणाव निवळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. भारत आणि चीन यांच्या सैनिकांनी सैन्यमाघारीनिमित्त परस्परांना मिठाई देऊन आनंद साजरा केला. देपसांग आणि डेमचोक या संघर्षबिंदूंवर आता 2020 पूर्वीची स्थिती निर्माण होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. तसेच भारत आणि चीन यांच्यात गेली साडेचार वर्षे असलेला सीमातणाव संपुष्टात येण्यास प्रारंभ झाला आहे. या कार्यवाहीवर दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आम्ही सामान्य स्थितीकडे वाटचाल करीत आहोत. अद्याप सर्वकाही पूर्णत्वास पोहचले आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र, योग्य वेळी योग्य ते घडले असा विश्वास निर्माण झाला आहे. सध्या आम्ही एकमेकांना मिठाई वाटून आणि सीमेवरच्या गस्तीचा प्रारंभ करुन एक टप्पा पूर्ण केला आहे. भविष्यकाळात पुढची पावले टाकण्यात येतील, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ सेनाधिकाऱ्याने व्यक्त केली.
गस्तबिंदूंचे निर्धारण
देपसांग येथील पाच तर डेमचोक येथील दोन गस्तबिंदूंपर्यंत भारताच्या सैनिकांनी गस्त घालण्यास प्रारंभ केला आहे. 2020 च्या गलवान संघर्षानंतर हे बिंदू चीनच्या सैनिकांनी बंद केले होते. तर भारतानेही चीनचे काही गस्तबिंदू बंद केले होते. चर्चेच्या अनेक फेऱ्यांच्या नंतर आणि राजकीय तसेच सामरिक विचारविमर्षानंतर भारत आणि चीन यांच्यात करार करण्यात आला. या कराराच्या प्रथम टप्प्याचे क्रियान्वयन आता पूर्ण झाले आहे. हा टप्पा एका आठवड्यात गाठला गेला. गेल्या बुधवारी दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन क्रियान्वयनाची पडताळणी केली. त्यानंतर गुरुवारी गस्तीला प्रारंभ करण्यात आला.
प्रत्यक्ष स्थितीवर अवलंबून
भारत आणि चीनच्या सेनेने कोणत्या बिंदूंपर्यंत गस्त घालायची, हे परिस्थितीवर अवलंबून होते. तसेच यापुढेही राहील. प्रत्येक बिंदूवर समप्रमाणात गस्त असेल असे नाही. पूर्वीही तशी परिस्थिती नव्हती. गस्त घालताना दोन्ही देशांच्या सेना एकमेकींना सूचना करणार आहेत. यामुळे संघर्ष टाळण्यास साहाय्य होणार आहे. स्थानिक कमांडर पातळीवर दोन्ही देशांमध्ये समन्वय ठेवला जाणार आहे. संध्याकाळी उशीरा किंवा रात्री गस्त घातली जाणार नाही, यावरही एकमत झाले आहे. 31 ऑक्टोबरच्या प्रथम गस्तीनंतर दोन्ही देशांच्या स्थानिक सैन्याधिकारी एकमेकांशी संपर्क करुन परिस्थितीचा आढावा घेतील असे स्पष्ट करण्यात आले.
पेच सुटण्याच्या मार्गावर
देपसांग आणि डेमचोक येथे सैन्यमाघार किंवा डिसएंगेजमेंट प्रक्रिया पूर्व निर्धारित कार्यक्रमानुसार आणि पूर्वनिर्धारित वेळेत पूर्ण झाल्याने महत्त्वाचा पेच सुटण्याच्या मार्गावर आहे. आता पुढच्या काळात दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱ्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन पुढची पावले टाकल्यास लडाख सीमेवर 2020 पूर्वीची स्थिती पुन्हा निर्माण होणे अशक्य नाही, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.
सावधानता राहीलच...
भारत आणि चीन यांच्यातील कराराचा प्रथम टप्पा विनासायास आणि सुरळीत पूर्ण झाला असला, तरी सावधानता बाळगली जाईलच, असे भारताच्या सैन्य सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सावधानता, दक्षता आणि सज्जता ही कोणत्याही सीमाक्षेत्रात ठेवावीच लागते. तशी ठेवली जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे.
प्रथम टप्प्याची पूर्तता...
- देपसांग आणि डेमचोक येथे सैन्यमाघार प्रक्रिया ठरल्याप्रमाणे सुरळीत
- भविष्यकाळात शांततेच्या दृष्टीने आणखी प्रगतीसाठी वातावरण अनुकूल
- पूर्वस्थिती पूर्णत: प्रस्थापित होण्यासाठी आणखी कालावधी आवश्यक