टाळ-मृंदगाच्या तालात लक्षतीर्थ डोलू लागले...
पाच दिवस तुकोबाराय त्रिशतकोत्तरी महोत्सव सोहळा
संत तुकोबारायांची २१ फुट उंचीची गरुडारुढ प्रतिमा
कोल्हापूरः सुधाकर काशीद
लक्षतीर्थ म्हणजे एकेकाळची दांडगाईवाडी. राहण्यासाठी निवारा मिळतोय म्हटल्यावर बहुजन समाज, बारा बलुतेदार व गरीब मध्यमवर्गीय कष्टाळू परिवारांनी या जागेवर आपापले निवारे मिळेल त्या साधनांनीशी उभे केले. साधारण 45 वर्षांपूर्वीचा तो काळ. त्याकाळी लाईट नव्हती. रस्ते नव्हते. पाणी नव्हते. कागदोपत्री जागा नावावर नव्हती. पण या साऱ्या अडचणीत इथले नागरिक टिकून राहिले. स्थिरस्थावर झाले. दांडगाई वाडी या नावाचे गैरसमजाचे वलय त्यांनी पुसून काढले. लक्षतीर्थ वसाहत या नावाने आपली वेगळी ओळख निर्माण करून गेले. गेल्या काही वर्षात तर अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक सुधारणांची देखणी किनार या वसाहतीस लागली आहे आणि यावर शिखर म्हणून की काय आजपासून शुक्रवारपर्यंत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सव सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह या वसाहतीत साजरा होत आहे.
लक्षतीर्थेश्वर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समिती आणि वसाहतीतील सर्व तरुण मंडळे, संघटनांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. शेवटच्या बस स्टॉपजवळ मोठा मंडप उभारला आहे आणि सारे लक्षतीर्थवासीय या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी झटू लागले आहेत पारायण सोहळा हा तसा काही नवीन प्रकार नाही. पण लक्षतीर्थ वसाहतीत असा सोहळा होणे याला फार मोठा संदर्भ आहे. कारण ही वसाहत त्याकाळी अशा परिस्थितीत उभी राहिली की त्यावेळी कोणीही एकमेकांच्या परिचयाचे नाही. पण गरज म्हणून सर्वजण एकमेकांच्या शेजारी मिळेल त्या साधनांशी राहू लागले. दहा ठिकाणचे दहा जण, दहा जाती-धर्माचे दहा जण एकमेकांचे हळूहळू शेजारी बनले.
सारेजण कष्टकरी त्यामुळे लक्षतीर्थ वसाहत ते कोल्हापूरपर्यंत चालत जाऊन, सायकलवरून ये-जा करत राबू लागले. पाण्याची सोय नाही. त्यामुळे लक्षतीर्थ तलावातून कावडीने पाणी आणून गरज भागवू लागले. मध्यंतरीच्या काळात थोडे काही गैरप्रकार वसाहतीत घडले. त्याची झळ काही प्रमाणात बसली. पण वसाहतीतील ज्येष्ठांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले. हळूहळू लाईटची सोय झाली. पाण्याचे नळ आले. रस्ते झाले. केएमटी बस सेवा सुरू झाली आणि दांडगाईवाडीचे स्वरूपच पालटले. लक्षतीर्थ वसाहत या नावाची किनार घेऊन या वसाहतीने आपले वेगळेपण दाखवून दिले.
आता या वसाहतीत धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असते. महाशिवरात्रीला लक्षतीर्थ तळ्यावर जत्रा भरते. महाप्रसाद होतो. गणेश जयंतीला धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा होतो. संत गजानन महाराज पुण्यतिथी सोहळा होतो. त्रिमूर्ती गल्लीत दत्त जयंती होते. रामनवमीला साईबाबांचा सोहळा होतो. आषाढी एकादशीला कोल्हापूर ते पंढरपूर पायी दिंडी जाते. हरिपाठ सोहळा होतो. शिवजयंतीला तर सारी वसाहत एकत्र येते. याशिवाय वैशिष्ट्या असे की संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सेना महाराज यांच्यासह सर्व संतांची स्मृती वेगवेगळ्dया सामाजिक उपक्रमातून जपली जाते. जात-पात हा प्रकारच बाजूला पडला आहे. फुटबॉलची टीम तयार झाली आहे. येथे कोणीही मी म्हणायचे नाही. ‘आम्ही म्हणायचे,’ अशी पद्धत रुजवली गेली आहे. येथे एकही कार्यकर्ता ‘मी’ केले, असे कधी म्हणत नाही. ‘आम्ही’ केले, असेच येथे म्हणायची पद्धत पडली आहे.
आता सोहळ्यानिमित्त आज हरिप्रसाद महाराज देहूकर यांचे कीर्तन, मंगळवारी चैतन्य सद्गुरु गोपाळ वासकर, बुधवारी श्रावण महाराज अहिरे, गुरुवारी निवृत्ती महाराज इंदुरीकर आणि शुक्रवारी बाबामहाराज केसरकर यांचे कीर्तन आहे. शुक्रवारी सायंकाळी सात ते दहा या वेळेत महाप्रसाद आहे.
सारी वसाहत सोहळामय..
या सोहळ्dयाच्या तयारीत घरटी एक माणूस सहभागी झाला आहे .येथे कोणी अध्यक्ष नाही. उपाध्यक्ष नाही . एकत्र यायचे व सोहळा पार पाडायचा, एवढेच उद्दिष्ट ठरवले गेले आहे. त्यामुळे सारी लक्षतीर्थ वसाहत सोहळामय होऊन गेली आहे.