अतिक्रमण काढल्याने उदगांव-शिरोळ बाय पास मार्गाने घेतला मोकळा श्वास
उदगाव प्रतिनिधी
उदगांव (ता.शिरोळ) ते बाय पास केपीटी ते चौंडेश्वरी सूतगिरणीपर्यंतच्या सांगली-कोल्हापूर महामार्गाला जोडणार्या रस्त्याची रूंदीकरणासह नव्याने रस्ता करण्यास प्रारंभ केला आहे. यात केपीटी-उदगांव बसस्थानकापर्यंतचे काम सुमारे 3 किलोमीटरच्या रस्त्याचे रूंदीकरण व मजबूतीकरण होत आहे. सध्या या मार्गावरील अतिक्रमणे यात खोकी, पत्र्याचे शेड, कट्टे, घराचे वाढीव बांधकाम यासह 70 हुन अतिक्रमणे सर्वाजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हटवण्यात आल्याने उदगांव-शिरोळ बाय पास मार्गाने मोकळा श्वास घेतला आहे.
उदगांव-केपीटी-चौंडेश्वरी असा राज्यमार्ग आहे. बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर राज्यातील हा पहिला रस्ता केला आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून या मार्गाची नोंद आहे. या रस्त्याच्या रूंदीकरण व मजबुतीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 4 व दुसर्या टप्प्यात 3 असा एकूण 7 कोटी रुपयेचा निधी राज्यातील अर्थसंकल्पातून मिळाला होता. तर गेल्या 3 महिन्यापूर्वी चौंडेश्वरी-केपीटीपर्यंतचा रस्त्या सर्व अतिक्रमणे काढून रूंदीकरण व मजबुतीकरण करण्यात आले आहे.
तर दुसर्या टप्प्यातील केपीटी-उदगांव बसस्थानकपर्यंतचा रस्ता रूंदीकरणासह मजबुतीकरण होत आहे. या रस्ता रूंदीकरणामुळे अतिक्रमण धारकांना बांधकाम विभागाकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. तरीही अनेकांनी अतिक्रमण काढले असल्याने नंदीवाले वसाहत, निकम मळा, मदरसा, गोकूळ सॅटेलाईट डेअरी, कुंजवन, उदगांव हायस्कूल ते बसस्थानकाजवळील उगळे दुकानापर्यंत या भागात रूंदीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. सर्व अतिक्रमण काढल्याने उदगांव-शिरोळ बायपास मार्गाने मोकळा श्वास घेतला आहे.