For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कल्पारंभी मायेच्या सहाय्याने भगवंत पुन्हा सृष्टी उत्पन्न करतात

06:27 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
कल्पारंभी मायेच्या सहाय्याने  भगवंत पुन्हा सृष्टी उत्पन्न करतात
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

भगवंत म्हणाले, माणसे कल्पनारुपी झोपेत असतात म्हणून त्यांना समोरचे जग खरे वाटते. जो जागा असतो त्याला वस्तुस्थितीची जाणीव असते. सदैव जागे राहण्यासाठी मायेला जाणून घेणे आवश्यक आहे. सर्व प्राणिमात्रांना मायाच उत्पन्न करते व तीच त्यांचा नाश करते. हे कौन्तेया, कल्पाच्याशेवटी माझ्या मायेप्रत सर्व भूते जातात. त्यांना दुसऱ्या कल्पाचे आरंभी मी मायेच्या सहाय्याने पुन्हा निर्माण करतो.

पुढील श्लोकात भगवंत सांगतात, दुसऱ्या कल्पाच्या आरंभी मायेच्या सहाय्याने पूर्णपणे माझ्यावर अवलंबून असलेली सृष्टी मी उत्पन्न करतो.  हाती प्रकृती घेऊनि जागवी मी पुन्हा पुन्हा । भूतांचा संघ हा सारा प्रकृतीच्या अधीन जो ।।8।।

Advertisement

ब्रह्मदेवाचा एक दिवस एका कल्पाएव्हढा असतो. हा कालावधी लाखो वर्षाचा असतो. तो उलटला की, सध्या अस्तित्वात असलेली सर्व सृष्टी मायेच्या आश्रयाला जाऊन गुप्त होते. ब्रह्मदेवाची रात्रही तेव्हढीच म्हणजे हजारो लाखो वर्षाची असते. ती उलटली की, ब्रह्मदेवाचा नवा दिवस उगवतो आणि त्याबरोबरच नवी भूतसृष्टी भगवंत मायेच्या सहाय्याने उदयाला आणतात. गीतारहस्यामध्ये लोकमान्य घडीच्या पंख्याचे उदाहरण देऊन ही कल्पना स्पष्ट करतात. ते म्हणतात घडीचा पंखा उलगडावा त्या सहजतेने परमेश्वर सृष्टीची निर्मिती करतात आणि तो बंद केल्याप्रमाणे सृष्टीचा लय होतो.

श्लोकाच्या विवरणात माउली काय सांगतात ते पाहू. ते म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की, अर्जुना, ज्याप्रमाणे सुताच्या वीणीतून वस्त्र तयार होते त्याप्रमाणे मायेतून पंचमहाभूतात्मक जग प्रगट होते. ज्याप्रमाणे विरजणाच्या संबंधाने पातळ दूध दहीरूपाने घट्ट होत जाते, त्याप्रमाणे माझ्याबरोबर नांदत असलेल्या मायेला, माझ्या मर्जीनुसार दृश्य सृष्टिचा आकार येतो. बी जमिनीत पुरल्यावर तिला पाणी घातले की, ते रुजते, तिच्यातून रोप उगवते आणि लहान मोठ्या फांद्यांच्या रूपाने विस्ताराला पावते, त्याप्रमाणे मी प्राणिमात्रांची निर्मिती करतो. राजाने नगर वसवले असे म्हणतात पण त्यासाठी राजाला श्रम करावे लागत नाहीत. त्याप्रमाणे ही सृष्टीनिर्मिती सहज जाता जाता होते असे समज. मी मायेच्या सहाय्याने सृष्टी निर्मितीचे कार्य एव्हढे सहजी करतो त्यासाठी मला कोणतेही श्रम करावे लागत नाहीत. ज्याप्रमाणे स्वप्नात असलेला मनुष्य विनासायास जागा होतो. त्याप्रमाणे भूतसृष्टीच्या निर्मितीसाठी किंवा ती मायेत विलीन करण्यासाठी मला काहीएक कष्ट करावे लागत नाहीत. ज्याप्रमाणे राजाच्या आधाराने त्याची आश्रीत प्रजा आपापले व्यवहार करते, त्याप्रमाणे प्रकृती माझ्या आधारे सृष्टीनिर्मितीचा उद्योग करते. पौर्णिमेला समुद्र भरतीने अफाट भरून येतो. त्यासाठी चंद्राला श्रम पडतात का? लोहचुंबकाच्या जवळीकीने अचेतन लोखंड हालते तर हलेना का? पण जड लोखंडाला ओढून आणण्याचे श्रम चुंबकाला पडतात काय? याप्रमाणे मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो व त्या योगाने ती प्रकृती भूतसृष्टीला एकसारखी उत्पन्न करू लागते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.