सद्गुरुंच्या कृपेने प्रयत्न केल्यावर कोणतीही गोष्ट साध्य होते
सहाव्या अध्यायाची सुरवात करताना स्वत:च्या शब्दांचे वर्णन करताना माउली म्हणतात, माझे शब्द संगीतातील सुराहून अधिक सुस्वर आहेत, सुवासिक आहेत. माझ्या शब्दांचा आस्वाद घेण्यासाठी इंद्रियांमध्ये भांडण लागेल कारण ते सर्वांचे समाधान करणारे असतील. सूर्य स्वत:च्या सामर्थ्याने सर्व जगाला जागे करतो. सूर्याप्रमाणे शब्दाचे सामर्थ्यही असामान्य असल्याने ते सर्वांना आत्मस्वरूपाची आठवण करून देतात. अशी ही ग्रंथरूपी मेजवानी मी निष्काम संतांना केली आहे. ह्या मेजवानीतील कैवल्यरूप पक्वान्नांचा उपभोग इंद्रियांना पत्ता न लागू देता नित्य नव्या आत्मप्रकाशाच्या उजेडात जो घेईल त्यालाच मोक्षरुपी लक्ष्मीचा लाभ होईल. वरवर असलेली शब्दरूपी गवसणी काढून आत अर्थरूपी ब्रह्म आहे, त्याच्याशी तद्रूप व्हावे, नंतर सुखामध्येच आनंदाने रंगून जावे. याप्रमाणे चित्त सूक्ष्म झाले, तर माझ्या निरूपणाचा उपयोग होईल.
माउली पुढे म्हणतात, इच्छा आणि अपेक्षा ह्यांनी घेरलेल्याना संसार आणि स्वर्ग ह्या दोन गोष्टींचे आकर्षण ज्यांना आहे त्यांना ह्या ग्रंथाची आवड निर्माण होणार नाही. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी बसू शकत नाहीत त्याप्रमाणे संसार आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी माणूस एकावेळी साधू शकत नाही. हे ज्यांना समजलेलं आहे ते संसारातील कर्तव्ये निरपेक्षपणे निभावून त्यापासून अलिप्त झालेले असतात. असे निरिच्छ अंत:करणाचे लोकच हा विषय समजून घेऊ शकतील. इतरांना या विषयाची गोडी समजणार नाही. ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना हे प्रतिपादन समजणार नाही. अशी एक कल्पना आहे की चकोर पक्षी फक्त चंद्राची शीतल किरणे ग्रहण करून गुजारा करतात. त्याप्रमाणे ज्ञानवानांना आत्मज्ञानाशिवाय इतर कोणतीही गोष्ट प्रिय नसल्याने हा ग्रंथ त्यांची आध्यात्मिक भूक शमवण्यासाठी उपयोगी पडेल. ह्यामध्ये संसार व स्वर्ग ह्याबद्दल काहीच सांगितले नसल्याने अज्ञानामुळे ज्यांना आत्मस्वरूपाचा विसर पडलेला आहे त्यांना ह्या ग्रंथातील विचार अगदी अनोळखी वाटतील.
भगवंतांनी जे सांगितलं आहे ते बुद्धीने आकलन करण्यास कठिण आहे, म्हणून ते शब्दांनी क्वचितच सांगता येईल. तरीपण माझे गुरु निवृत्तीनाथ, यांच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते पाहीन व सांगेन. सद्गुरूंच्या कृपेचे महात्म्य असे आहे की, ती प्राप्त झाल्यावर अतींद्रिय ज्ञानाच्या बलाने जे दृष्टीला दिसत नाही, ते सहजी पाहता येते. जर आपल्या नशिबाने परीस हातात आला तर किमयेच्या योगानेही प्राप्त न होणारे सोने लोखंडातच मिळते त्याप्रमाणे जर सद्गुरूची कृपा झाली तर प्रयत्न केल्यावर कोणतीही गोष्ट साध्य होते आणि माझ्यावर सद्गुरूंची अलोट कृपा आहे. त्या सद्गुरूकृपेच्या योगाने मी व्याख्यान करीन आणि व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवीन. जरी ते ब्रह्म इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे असले तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना घेता येईल अशा पद्धतीने मी त्यांची मांडणी करीन. आत्मज्ञानाचे आकलन होण्याचे अधिकारी कोण ते सांगून झाल्यावर सद्गुरूंच्या कृपेने त्याचे इंद्रियांना दिसणारे सगुण रूप मी साकार करीन.
क्रमश: