For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वविक्रमी विजयासह टीम इंडिया फायनलमध्ये

07:22 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
विश्वविक्रमी विजयासह टीम इंडिया फायनलमध्ये
Advertisement

युवा विश्वचषक : अफगाणिस्तानवर 7 गड्यांनी मात : सामनावीर अॅरॉन जॉर्जचे शतक

Advertisement

वृत्तसंस्था/ बुलावायो

सामनावीर ऍरॉन जॉर्जचे दमदार शतक आणि वैभव सूर्यवंशीसह कर्णधार आयुष म्हात्रेच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने युवा विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानला 7 विकेट्सनी पराभूत करत फायनल गाठली आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघ दहाव्यांदा फायनलमध्ये पोहचला आहे. आता, भारत व इंग्लंड यांच्यात 6 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाईल.

Advertisement

प्रारंभी, प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने निर्धारित 50 षटकांत 4 बाद 310 धावांचा डेंगर उभा केला. यानंतर भारतीय संघाने विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना 42 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विजय निश्चित केला. विशेष म्हणजे, युवा विश्वचषक स्पर्धेत हा सर्वोच्च यशस्वी धावसंख्येचा पाठलाग आहे. या विजयासह भारताने दहाव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे, इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला नमवत फायनल गाठली आहे.

ऍरॉन जॉर्जचे शानदार शतक

अफगाणने विजयासाठी दिलेल्या 311 धावांचा पाठलाग करताना भारताकडून ऍरॉन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनीही चांगली सुरुवात केली. वैभव आक्रमक खेळत असताना दुसऱ्या बाजूने जॉर्ज त्याला साथ देत होता. वैभवने 24 चेंडूत अर्धशतकही केले. पण आक्रमक खेळणाऱ्या वैभवला 10 व्या षटकात नूरीस्तानी ओमरझाईने बाद केले. वैभवने 33 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 68 धावांची खेळी केली. त्याने जॉर्जसोबत 90 धावांची भागीदारी केली. तो बाद झाल्यानंतरही कर्णधार आयुष म्हात्रेने जॉर्जला मोलाची साथ दिली. या दोघांनीही भारतीय संघाला 27 षटकांच्या आतच 200 धावांचा टप्पा पार करून देत विजयाचा मार्ग सोपा केला. दरम्यान, आयुष म्हात्रे 27 व्या षटकांत बाद झाला. त्याने 59 चेंडूत 62 धावांची खेळी साकारली. यानंतर ऍरॉनने मात्र शतकी खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 104 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारासह 115 धावा फटकावल्या. भारतीय संघाला विजयासाठी 11 धावांची गरज असताना ऍरॉन बाद झाला. यानंतर विहान मल्होत्रा आणि वेदांत त्रिवेदी यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विहान 38 धावांवर नाबाद राहिला.

अफगाणिस्तानच्या पदरी निराशा

प्रारंभी, अफगाणनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला चांगली सुरूवात मिळाली, सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 53 धावा जोडल्या. उस्मान सदतने 39, तर खलिद अहमदजाईने 31 धावा जोडल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फैजल खान आणि उजैरूल्लाह नियाजईने अफगाणिस्तानचा डाव सांभाळला. फैजल खानने 93 चेंडूंचा सामना करत 15 चौकारांच्या साहाय्याने 110 धावांची खेळी केली. तर नियाजईने 86 चेंडूंचा सामना करत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या साहाय्याने नाबाद 101 धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर अफगाणनने 50 षटकात 4 गडी बाद 310 धावांचा डोंगर उभारला.

संक्षिप्त धावफलक

अफगाणिस्तान 50 षटकांत 4 बाद 310 (उस्मान सादत 39, खलिद अहमदजाई 31, फैजल खान 110, नियाजई नाबाद 101, कनिष्क चौहान आणि दीपेश देवर्धन प्रत्येकी 2 बळी).

भारत 41.1 षटकांत 3 बाद 311 (ऍरॉन जॉर्ज 115, वैभव सूर्यवंशी 68, आयुष म्हात्रे 62, विहान मल्होत्रा नाबाद 38, ओमरझाई दोन बळी).

रेकॉर्ड ब्रेक चेस

311 या यशस्वी धावसंख्येचा पाठलाग करताच भारतीय संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे. याआधी भारतीय संघाने इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग कधीच केला नव्हता. याआधी 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना 245 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्याआधी 2012 ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना 226 धावा आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना 217 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तसेच अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंडने 305 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. भारतीय संघाने अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Advertisement
Tags :

.