For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्ञानी मनुष्याने आपण कर्ते नाही ह्याची खुणगाठ मनाशी पक्की बांधलेली असते

06:30 AM Feb 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्ञानी मनुष्याने आपण कर्ते नाही ह्याची खुणगाठ मनाशी पक्की बांधलेली असते
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

भगवंत म्हणाले, कोणते कर्म केले की, आपला उद्धार होईल हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. कर्म, विकर्म, अकर्म म्हणजे काय, हे जाणले पाहिजे ह्या विश्वाला आकार देणारे कर्म, योग्य कर्म होय. कर्माचे स्वरूप जाणून घेतले, म्हणजे माणूस कर्माने बध्द होत नाही. हे जग कर्माच्या अधीन आहे. कर्म करण्याच्या नादात तो कोणत्या उद्देशाने कर्म करेल आणि त्यासाठी किती खालच्या पातळीला उतरेल हे सांगणे कठीण आहे. म्हणून कर्माची गती गहन आहे असे म्हणतात. पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, ज्याने कर्म, अकर्माबद्दल विशेष ज्ञान करून घेतलेले आहे अशा बुद्धिमान माणसाचे वैशिष्ट्या सांगताना भगवंत म्हणतात, जो कर्म करत असताना, चुकून आपण अकर्म करत नाहीना ह्याबद्दल दक्ष असतो किंवा अकर्माचे आचरण हातून घडू लागल्यावर सावध होऊन जो कर्म करू लागतो, तो बुद्धिमान होय. योगी ह्याप्रमाणे योग्य कर्मे करून कृतकृत्य होतो.

कर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म जो तसे । तो बुद्धिमंत लोकांत तो योगी कृत-कृत्य तो ।।18।।

Advertisement

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, कोणतेही कर्मे करीत असताना आपण कर्ते नाही हे ज्याच्या मनात असतं तो कर्मफळाची अपेक्षा करत नाही. ज्या गोष्टीची अपेक्षा नसते तिकडे माणसाचे लक्ष जात नसल्याने त्यांची कर्म करण्यात तल्लीनता होऊन ते कर्म तो उत्कृष्टपणे करत असतो. त्याच्या ह्या लक्षणांवरून तो ज्ञानी आहे, असे जाणावे. ज्ञानी मनुष्याने आपण कर्ते नाही ह्याची खुणगाठ मनाशी पक्की बांधलेली असते. ज्याप्रमाणे जलाशयाजवळ उभा राहिलेल्या माणसाला पाण्यात त्याचे प्रतिबिंब दिसत असले तरी आपण त्या प्रतिबिंबापेक्षा वेगळे आहोत हे त्याला निश्चितपणे माहित असते अथवा नावेत बसून जात असताना किनाऱ्यावरील झाडे भरभर मागे पडत चालली आहेत, असे त्याला दिसत असले तरी झाडे स्थिर आहेत ह्याबद्दल त्याला कोणतीही शंका नसते. त्याप्रमाणे आपण कर्म करत आहोत असे त्याला दिसत असले तरी आपण कर्ते नसून, ईश्वर आपल्याला कर्म करण्याची प्रेरणा देऊन आपल्या हातून कर्म करून घेत आहे, हे तो पुरेपूर जाणून असतो. आणखी एक उदाहरण सांगायचे झाले तर सूर्य उगवतो व मावळतो असे आपण म्हणतो. ह्या आपल्या म्हणण्यावरून तो चालतो आहे असे वाटते. वास्तविक तो स्थिर आहे, चालत / फिरत नाही. त्याप्रमाणे कर्म करीत असताना, ते कर्म आपण करीत नाही, हे जो जाणतो, तोच नैष्कर्म्य जाणतो. असा मनुष्य दिसताना सामान्य मनुष्यासारखा दिसतो परंतु आतून परब्रम्हाशी एकरूप झालेला असतो. आणि परब्रह्माने सर्व विश्व व्यापले असल्याने त्याने विश्व पाहिले नसले तरी पाहिल्यासारखेच असते. त्याने काही न करताही सर्वकाही केल्याप्रमाणेच आहे व भोगवस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणेच आहेत.

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, सर्व इच्छा, संकल्प सोडून जो कर्मे करतो त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेले असल्याने त्याची कर्मे आत्मज्ञानाच्या प्रभावाने जळून जातात. त्याला पंडित म्हणून मान्यता मिळते.

उद्योग करितो सारे काम-संकल्प सोडुनी । ज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित ।। 19 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, ज्याने कधी कर्तव्यकर्मे करण्याचा कंटाळा केलेला नाही, ज्याला चुकूनसुद्धा कधीही फळाची इच्छा होत नाही, अमुक एक कर्म मी करीन किंवा सुरु केलेले कर्म मी पूर्ण करीन असे काहीही मनात येत नाही त्याने ज्ञानरूपी अग्नीने सर्व कर्मे जाळून टाकलेली असल्याने त्या माणसाच्या रुपात प्रत्यक्ष ब्रह्मच वावरत आहे असे तू समज.

क्रमश:

Advertisement
Tags :

.