ज्ञानी माणसाला मरताना शरीराचा त्याग करावा लागेल ह्याचे वाईट वाटत नसते
भगवंत म्हणाले, जे माझ्या आश्रयाला येऊन म्हातारपण आणि मृत्यूवर मात करू इच्छितात त्यांना ब्रह्म आणि अध्यात्म ह्यांचे संपूर्ण ज्ञान होते. ह्या अर्थाचा
झटती आश्रये माझ्या जरा-मृत्यु गिळावया । ते ब्रम्ह जाणती पूर्ण तसे अध्यात्म कर्म हि ।। 29 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत.
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, पार्था, मायेच्या विळख्यातून सुटण्याचा मनुष्य जसजसा प्रयत्न करू लागतो त्याची त्यातून सुटका तर होत नाहीच उलट तो त्यात आणखीन आणखीन फसत जातो. संत साहित्याच्या अभ्यासातून त्याच्या लक्षात येते की, ईश्वराला शरण गेल्याशिवाय मायेचा वेढा उठणे शक्य नाही आणि तो उठल्याशिवाय जन्ममरणाच्या फेऱ्यांतून आपण सुटणार नाही. मग त्यासाठी आवश्यक ते साधन करण्याची त्याला इच्छा होते. म्हणून तो नवविधा भक्तीच्या माध्यमातून ईश्वराची भक्ती करू लागतो आणि मला ह्या मायेच्या विळख्यातून सोडवा अशी आर्त आळवणी करू लागतो. यथावकाश ईश्वर त्याच्यावर प्रसन्न होतो आणि प्रसाद म्हणून त्याला ब्रह्मप्राप्ती होते व पिकलेल्या फळांच्या रसाप्रमाणे तो पूर्णतेस पावतो. आपण धन्य झाल्याच्या भावनेने त्याला सर्व जगभर आनंद भरलेला दिसतो. आत्मज्ञान प्राप्तीची त्याची हौस पुरी होऊन आपण करत असलेल्या कर्मापासून आपण अलग आहोत हे लक्षात आल्याने, ईश्वराच्या मर्जीनुसार हातून कर्मे होवोत अथवा न होवोत त्याला कोणताही फरक पडत नसल्याने त्याचे मन कायम शांत रहाते. जीवनकाल संपला की, त्याचा आत्मा ईश्वरात विलीन होऊन जातो.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, सर्व तत्वांचा, सर्व देवांचा मीच आधार असून सर्व यज्ञांचे धारण करणारा मीच आहे हे लक्षात घेणारे मृत्यूसमयी सावधपणे माझेच स्मरण करतात.
अधिभूताधिदैवांत अधियज्ञांत जे मज । देखती ते प्रयाणी हि जाणती मज सावध ।। 30 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंत अर्जुनाला असे म्हणाले की, सर्व विश्व मायेने वेढलेले आहे असा अनुभव घेतलेले लोक माझ्या चरणी येतात. त्यांना आत्मज्ञानाच्या बळावर अखिल विश्वाचा आधार मीच आहे हे लक्षात येते. त्यामुळे मृत्यूसमयी आता आपल्याला ह्या शरीराचा त्याग करावा लागणार ह्या कल्पनेने वाईट वाटत नाही.
सामान्य माणसाला आपला मृत्यू आता जवळ आलेला आहे हे लक्षात आले की, हे जग, आपली प्रिय माणसे, घरेदारे, गाड्या, बंगले इथेच सोडून निघून जावे लागणार ह्याची त्याला तीव्रतेने जाणीव होते. त्यामुळे त्याला अतिशय दु:ख होते परंतु ज्याने ईश्वराला प्रसन्न करून घेतलेले असते तो असे अनुभवत असतो की, हे जग ईश्वराने कायमचे व्यापलेले असून समोर दिसणारी माणसे व इतर वस्तू ह्यांचे अस्तित्व तात्पुरते आहे. त्यामुळे हे सर्व सोडून जाताना दुख होत नाही. त्याला समोर दिसणारी दुनिया ही पाण्यावर काढलेली रांगोळी सारखे किंवा फळ्यावर काढलेल्या चित्रासारखे वाटत असते. एका लाटेने पाण्यावरची रांगोळी नाहीशी होते किंवा फळ्यावरचे चित्र कुठल्याही क्षणी पुसले जाऊ शकते.