For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालदीवला सुचले शहाणपण

06:18 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
मालदीवला सुचले शहाणपण
Advertisement

मुइज्जूंकडून दोन मंत्र्यांचा राजीनामा मंजूर

Advertisement

वृत्तसंस्था/ माले

मालदीवला आता शहाणपण सुचल्याचे मानले जाऊ शकते. चीनसमर्थक असलेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी हळूहळू स्वत:चा सूर बदलण्यास सुरुवात केली आहे. स्वत:च्या आगामी भारत दौऱ्यापूर्वी मुइज्जू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या तीन पैकी दोन मंत्र्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी सोशल मीडियावर भारत आणि पंतप्रधान मोदींविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर भारत आणि मालदीवच्या संबंधांमधील तणाव वाढला होता. तर मालदीवच्या विदेश मंत्रालयाने मंत्र्यांच्या टिप्पणीपासून अंतर राखले होते. संबंधित मंत्री हे मालदीव सरकारच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे म्हटले होते. यानंतर तीन उपमंत्र्यांना निलंबित करण्यात आले होते. यातील उपमंत्री मरियम शिउना आणि मालशा शरीफ यांनी मंगळवारी राजीनामा दिला होता.

Advertisement

लवकरच भारतात येणार

मोहम्मद मुइज्जू लवकरच भारताचा अधिकृत दौरा करणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवक्त्या हीना वलीद यांनी दिली आहे. या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु दोन्ही देश यासंबंधी चर्चा करत आहेत. चीनसमर्थक मोहम्मद मुइज्जू यांनी 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात भाग घेतला होता.

मुइज्जूंनी तोडली परंपरा

मालदीवमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक जिंकणारा प्रत्येक नेता स्वत:च्या पहिल्या अधिकृत विदेश दौऱ्यासाठी भारताची निवड करत होता. परंतु मोहम्मद मुइज्जू यांनी ही परंपरा मोडली होती. त्यांनी भारताऐवजी सर्वप्रथम तुर्कियेचा दौरा केला आणि यानंतर चीनला भेट दिली होती.

तणावपूर्ण संबंध

मुइज्जू हे अध्यक्ष झाल्यापासून भारताचे मालदीवसोबतचे संबंध तणावपूर्ण आहेत. त्यांनी शपथ घेतल्याच्या काही तासातच मालदीवला भारताकडून प्रदान करण्यात आलेल्या विमान प्लॅटफॉर्मवर तैनात भारतीय सैनिकांना हटविण्याची घोषणा केली होती. भारतीय सैनिकांच्या जागी मालदीवने स्वत:च्या कर्मचाऱ्यांना तैनात केले होते.

Advertisement
Tags :

.