विप्रोचा नफा 26 टक्क्यांनी वाढला
मात्र समभाग 6 टक्क्यांनी घसरणीत : महसूल 1.33 टक्क्यांनी वधारला
मुंबई : जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे विप्रोची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी राहिली असे विश्लेषकांचे मत आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा वर्षाच्या आधारावर 26 टक्क्यांनी वाढून 3,570 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 2,835 कोटी रुपये होता. महसूल 1.33 टक्क्यांनी वाढून 22,504 कोटी रुपये झाला. आयटी सेवा कंपनी विप्रोचे समभाग गुरुवार, 17 एप्रिल चौथ्या तिमाहीच्या निकालांनंतर सुमारे 6 टक्क्यांनी घसरले आहेत. सकाळी 11 वाजता ते 234 पातळीवर व्यवहार करत होते. विप्रोचा महसूल वार्षिक 1.33 टक्क्यांच्या वाढीसह 22,504 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल 22,208 कोटी रुपये होता. त्याच वेळी, तिमाही आधारावर कंपनीचा निव्वळ नफा 6.44 टक्क्यांनी वाढला आहे. तिसऱ्या तिमाहीत तो 3,354 कोटी रुपये होता. कंपनीने काल (बुधवार, 16 एप्रिल) संध्याकाळी शेअरबाजाराचे कामकाज झाल्यावर चौथ्या तिमाहीचे आर्थिक वर्ष 25 साठी निकाल जाहीर केले.
महसुलात घट अपेक्षीत
आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीत महसुलात घट होण्याचे संकेत: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (आर्थिक वर्ष 2026) कंपनीचा महसूल 3.5 ते 1.5 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. याशिवाय, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे आणि जागतिक बाजारपेठेत मंदीची भीती यामुळे गुंतवणूकदार निराश झाले आहेत.
आयटी सेवा महसुलात घट
कंपनीच्या आयटी सेवा महसुलात तिमाही आधारावर 1.2 आणि वर्षाच्या आधारावर 2.3 टक्क्यांनी घट झाली, जी युरोपमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये, विशेषत: बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रांमध्ये मंदीचे संकेत देते. जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे विप्रोची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी राहिली असे विश्लेषकांचे मत आहे.