निफ्टी 50 तून विप्रो होणार बाहेर
वृत्तसंस्था/मुंबई
नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात निफ्टीने आपल्या निफ्टी 50 बेंचमार्क इंडेक्समध्ये बदलाची घोषणा केली आहे. आता या निर्देशांकात ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ म्हणजेच बीएसई लिमिटेडचा समावेश होणार आहे. हा बदल आगामी 30 सप्टेंबरपासून अधिकृतपणे अमलात येणार असून, यामुळे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ या मानाच्या इंडेक्सचा हिस्सा राहिलेली तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘विप्रो’ यातून बाहेर पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
कंपन्यांच्या बाजारातील कामगिरी, मूल्य आणि आर्थिक निकषांच्या आधारावर एक्सचेंज बेंचमार्क इंडेक्समध्ये फेरबदल करत असतात, ज्याचा थेट परिणाम संस्थात्मक गुंतवणुकीवर होतो. विप्रो कंपनी 17 जानेवारी 2002 पासून सतत निफ्टी 50 निर्देशांकात राहिली आहे. मात्र, गेल्या काही कालावधीत मात्र सुस्त कामगिरीमुळे विप्रोला आता निफ्टी 50 मधून निरोप घ्यावा लागणार आहे. विप्रो आता ‘निफ्टी नेक्स्ट 50’ इंडेक्समध्ये स्थान मिळवेल.
निवडीचे गणित आणि आर्थिक आकडेवारी
एनएसईच्या नियमांनुसार, बीएसई लिमिटेडचे सरासरी फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन 1 लाख 40 हजार 879 कोटी रुपये इतके मजबूत आहे. हे प्रमाण निफ्टी 50 मधील कंपन्यांच्या निकषांवर तंतोतंत बसते. दुसरीकडे, विप्रोचे सरासरी फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन 55 हजार 930 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. विशेष म्हणजे, या शर्यतीत टीव्हीएस मोटर कंपनी (84 हजार 566 कोटी रुपये) आणि डिव्हिज लॅबोरेटरीज (82 हजार 930 कोटी रुपये) यांसारख्या कंपन्या देखील पात्रतेच्या शर्यतीत होत्या; परंतु निफ्टी 50 मधील सर्वात कमी मार्केट कॅप असलेल्या एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी (65 हजार 666 कोटी रुपये) आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स (73 हजार 054 कोटी रुपये) यांच्या तुलनेत दीडपट निकषात बसत नसल्यामुळे त्यांना वगळले गेले आहेत.