विप्रोने कमावला जून तिमाहीत 3003 कोटींचा नफा
महसुलात 3 टक्के घसरण : 330 नवे कर्मचारी सामील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील चौथ्या नंबरची सर्वात मोठी आयटी कंपनी विप्रो लिमिटेड यांनी आपला जून अखेरचा तिमाही निकाल जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीने निव्वळ नफ्यामध्ये वर्षाच्या आधारावर 4.6 टक्के वाढीसह 3003 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे.
वर्षाच्या मागे समान अवधीमध्ये कंपनीने 2870 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. नफ्यामध्ये वाढ नोंदवली असली तरी महसुलामध्ये मात्र कंपनीने सदरच्या तिमाहीत घसरण नोंदवली आहे. जून तिमाहीत कंपनीचा महसूल 3.8 टक्के घसरणीसह 21 हजार 964 कोटी रुपये इतका होता. वर्षाच्या आधी समान अवधीमध्ये 22 हजार 831 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता. तिमाही आधारावर पाहता महसुलामध्ये 1.1 टक्के घसरण राहिली आहे.
समभाग 7 टक्के घसरणीत
बेंगळूरची आयटी कंपनी विप्रोचे तिमाही निकाल जाहीर झाले असून त्याचे नकारात्मक पडसाद शेअरबाजारात सोमवारी पाहायला मिळाले. समभाग इंट्रा डे दरम्यान 7.5 टक्के इतका घसरला होता. एनएसईवर समभाग 8.22 टक्के घसरत इंट्रा डे दरम्यान 511 रुपयांवर खाली आले.
तिमाहीत उमेदवारांची भरती
30 जून 2024 ला संपलेल्या तिमाहीमध्ये विप्रो कंपनीत 330 नवे कर्मचारी भरती झालेले आहेत. आता कंपनीत काम करणाऱ्या एकंदर कर्मचाऱ्यांची संख्या वाढून 2 लाख 34 हजार 391 इतकी झाली आहे. कंपनीने सांगितले की आयटी सेवा संदर्भातील ऑपरेटिंग मार्जिन 16 टक्के इतके प्राप्त केले आहे. विप्रोचे एकूण उत्पन्न 3604 कोटी रुपये झाले आहे. वर्षाच्या आधारावर पाहता उत्पन्नात चार टक्के वाढ नोंदवली आहे.