‘विप्रो’कडून केअर डर्माटचचे अधिग्रहण
60 टक्के हिस्सेदारी 387 कोटी रुपयांना खरेदी करणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
विप्रो कंझ्युमर केअर अँड लायटिंगने मंगळवारी सांगितले की, ते प्रीमियम स्किनकेअर ब्रँड डर्माटचमधील 60 टक्के हिस्सेदारी 387.5 कोटी रुपयांना खरेदी करणार आहेत. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उर्वरित 40 टक्के हिस्सेदारीदेखील पुढील तीन वर्षांत खरेदी केली जाईल. कंपनीच्या मते, हे विप्रो कंझ्युमर केअर अँड लायटिंगचे 18 वे अधिग्रहण आहे. विप्रो कंझ्युमर केअर अँड लायटिंगचे सीईओ आणि विप्रो एंटरप्रायझेसचे एमडी कुमार चंदर म्हणाले, ‘डिजिटल ब्रँड्समधील आमचा पहिलाच प्रवेश असल्याने डर्माटचचे अधिग्रहण आमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. आम्ही नेहमीच हे स्पष्ट केले आहे की, आम्ही केवळ अशाच डिजिटल ब्रँड्सचा विचार करू ज्यांच्यामध्ये ऑफलाइन विस्तार करण्याची क्षमता आहे आणि डर्माटचने ते आधीच सिद्ध केले आहे.“ कुमार चंदर म्हणाले की, डर्माटचने अल्पावधीतच ग्राहकांचा मोठा विश्वास जिंकला आहे. कंपनीचा विश्वास आहे की, आपला नवोन्मेषावर आधारित दृष्टिकोन विप्रोच्या क्षमतांसोबत जोडल्यास ब्रँडला पुढे नेण्याची मोठी क्षमता आहे.
जागतिक ब्रँड तयार करण्यावर लक्ष केंद्रित
डर्माटचचे सह-संस्थापक अनिश नागपाल आणि अमित पुरस्वानी म्हणाले, ‘विप्रोसोबतची भागीदारी हा डर्माटचच्या प्रवासातील एक मोठा टप्पा आहे. सुरुवातीपासूनच, आमचे ध्येय एक असा स्किनकेअर ब्रँड तयार करणे हे आहे जो विश्वासार्ह, विज्ञान-आधारित आणि प्रभावी असेल आणि जो ग्राहकांच्या खऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करेल.“