संसदेच्या शीतकालीन अधिवेशनास प्रारंभ
प्रथम दिवसाचे कामकाज विरोधकांच्या गोंधळामुळे वाया, अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर होणार निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेच्या शीतकालीन अधिवेशनाला सोमवारी प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षप्रणित महायुतीच्या घवघवीत यशानंतर होत असलेल्या या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होऊन निर्णय अपेक्षित आहे. या विधेयकांमध्ये वक्फ कायदा सुधारणा विधेयकाचाही समावेश आहे. तसेच काही आर्थिक आणि कर्मचाऱ्यांसंबंधीची विधेयके चर्चेला आणली जाणार आहेत.
तथापि, या महत्त्वाच्या अधिवेशनाचा प्रथम दिवस विरोधकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे वाया गेला. सकाळी कामकाजाचा प्रारंभ होताच विरोधकांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेच्या एका न्यायालयाने दिलेल्या नोटीसीचा मुद्दा उपस्थित करुन गोंधळ घालण्यास प्रारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी यांना संरक्षण दिले आहे, असा त्यांचा आरोप होता. त्यांनी ‘मोदानी... मोदानी’ अशा घोषणा देत सभागृह डोक्यावर घेतले. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये अशीची स्थिती होती. त्यामुळे काही वेळातच दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाल्याची घोषणा अध्यक्षांकडून करण्यात आली.
बुधवारी पुन्हा कामकाज
आज मंगळवारी संसदेत ‘संविधान दिन’ साजरा केला जाणार आहे. त्यामुळे नेहमीचे कामकाज होणार नाही. परिणामी संसदेच्या कामकाजाला आता बुधवारीच पुन्हा प्रारंभ होईल. त्यामुळे सोमवारी गोंधळाच्या वातावरणात कामकाज बुधवारपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती संसदेच्या सचिवालयाने दिली आहे.
संयुक्त संसदीय समितीची मागणी
अदानी मुद्द्यावर संशोधन करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी विरोधकांकडून पुन्हा करण्यात आली. ‘मोदानी घोटाळ्या’ची चौकशी अशा समितीच्या माध्यमातूनच योग्य प्रकारे होऊ शकते, असे विरोधकांचे म्हणणे आहे. सरकारने या मुद्द्यावर चर्चेसाठी सज्ज असल्याचे सूचित केले. तथापि, लोकसभेत घोषणाबाजी होतच राहिली. त्यामुळे कामकाज स्थगित झाले.
विरोधी आघाडीची बैठक
संसद अधिवेशनाचा आरंभ होण्यापूर्वी सकाळी विरोधकांच्या आघाडीची संयुक्त बैठक संसद परिसरात घेण्यात आली. संसदेतील रणनीतीसंबंधी या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अदानी प्रकरणामुळे देशाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे प्रथम सरकारने या विषयावर सविस्तर चर्चा संसदेत होऊ द्यावी. नंतर इतर विषय हाताळावेत, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. अदानी प्रकरणामुळे शेअरबाजाराची घसरण झाली. त्यामुळे लक्षावधी गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी रुपये पाण्यात गेले. या विषयावरही चर्चा घ्यावी, असे बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीचे अध्यक्षस्थान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे होते.
मला शिकवू नका
राज्यसभेत सभागृहाचे अध्यक्ष जगदीप धनखड आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. आपण विरोधी पक्षनेते आहात. आपण बोलताना संयमित भाषा उपयोगात आणली पाहिजे, अशी सूचना त्यांना राज्यसभा अध्यक्षांनी केली. यावर आपण मला काही शिकवू नका, असे उत्तर खर्गे यांनी दिले. त्यामुळे हा संसद परिसरात चर्चेचा विषय झाला होता.
कोणती महत्त्वाची विधेयके...
या अधिवेशनात एकंदर 17 विधेयके सरकारकडून सादर केली जाणार आहेत. त्यांच्यापैकी सहा विधेयके अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहेत. या विधेयकांमध्ये वक्फ कायदा सुधारणा विधेयक सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहे. सध्या हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे आहे. समितीचा अहवाल नियमाप्रमाणे शीतकालीन अधिवेशनाच्या प्रथम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी संसदेत सादर होणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात हे विधेयक चर्चेला येऊ शकते. या शिवाय ‘सहकार विद्यापीठ’ स्थापन करण्यासंबंधीचे विधेयकही मांडले जाईल. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयकही सादर होण्याची शक्यता आहे. पंजाब न्यायालय सुधारणा विधेयक, व्यापारी शिपिंग विधेयक आदी महत्त्वाची विधेयके आहेत. तसेच मागच्या अधिवेशनांमध्ये सादर करण्यात आलेली 11 विधेयके अद्याप प्रलंबित आहेत. त्यांच्यावर चर्चा होऊ शकते. हे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत आहे.
बॉक्स
पहिला दिवस गेंधळी खासदारांचा
ड पहिल्या दिवशी प्रचंड गदारोळ, दोन्ही बाजूंचे परस्परांवर आरोप-प्रत्यारोप
ड या अधिवेशनात वक्फ विधेयकासह अनेक महत्त्वाची विधेयके सादर होणार
ड आज मंगळवारी ‘संविधान दिन’ असल्याने आता बुधवारी कामकाज होणार