9 ते 20 डिसेंबरदरम्यान बेळगावात हिवाळी अधिवेशन
राज्यपालांकडून अधिकृत आदेश बाकी
बेंगळूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होणार आहे. 9 ते 20 डिसेंबर या कालावधीत बेळगावमधील सुवर्णसौध येथे अधिवेशन भरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अधिवेशन बोलावण्यासंबंधी कायदा आणि संसदीय कामकाज मंत्रालयाने राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. राज्यपालांकडून यासंबंधी अधिकृत आदेश जारी होणार आहे. अलीकडेच विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर आणि विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी सुवर्णसौधला भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. शिवाय हिवाळी अधिवेशनासंबंधी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दि. 26 व 27 डिसेंबर 1924 रोजी बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेसच्या 39 व्या अधिवेशनाला यंदा 100 वर्षे पूर्ण होत असल्याने 26 व 27 डिसेंबर रोजी बेळगावात काँग्रेस अधिवेशन भरविण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचे समजते.