आला हिवाळा.. आरोग्य सांभाळा..
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. बोचरी थंडी सर्वांना हवीहवीशी वाटते. हिवाळा ऋतु आरोग्यदायी मानला जात असला तरी जुनाट सर्दी, पडसे, खोकला, दमा, अस्थमा, त्वचाविकार, रक्तवाहिन्या व हाडे, फुफ्फुसांचे आजार बळावण्याची शक्यता असते. अशा रूग्णांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
थंडी व धूळ यामुळे हवेची पत घसरलेली असते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो. धुली कणांपासून संरक्षण करण्यासाठी दमा, अस्थमाच्या रूग्णांनी मास्क वापरण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आहारात हंगामी फळ-भाज्यांचा समावेश व व्यायामाने विविध आजारांना दुर ठेवता येते. ऋतु बदलला की सुरवातीला त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. बदललेल्या वातावरणामुळे शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही कालावधीची गरज असते.
हिवाळ्यात कफ असलेल्या रुग्णांना अधिक त्रास होतो. शिंका येणे, नाक वाहणे, घसा खवखवणे, खोकला येणे, धाप लागणे, त्वचा फुटणे आदी आजार डोके वर काढतात.या दिवसात सकाळी कोवळ्या उन्हात फिरावे. कोवळ्या उन्हामध्ये विटामीन डी चे प्रमाण अधिक असते. हिवाळ्यात भूक लागण्याचे प्रमाण वाढते. हिवाळ्यात व्यायामाचे प्रमाण वाढविले, तर शरारावर चांगले परिणाम होतात.
कडधान्य, फळाचा समावेश आवश्यक
हिवाळ्यात व्हायरल इन्फेक्शनची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज असते. कडधान्य, हंगामी फळ व भाज्यांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो.
आहारासोबत व्यायामही महत्वाचा
शरीराच्या तंदुरूस्तीसाठी आहारासह नियमित व्यायामही आवश्यक आहे. शरीराची योग्य पद्धतीनं हालचाल होणं आवश्यक आहे. तज्ञांच्या मार्गदर्शनाने नियमित व्यायाम करावा. रोज सकाळी चालणे लाभदायक ठरू शकते.
उबदार कपडे परिधान करावे
हिवाळ्यात त्वचेशी संबंधित विकार मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. त्वचेच्या संरक्षणाठी उबदार कपडे परिधान करावेत. स्वेटर, पाय-मोजे, हात-मोजे, कानटोपी आदींचा वापर करावा. तेल किंवा बॉडी लोशनचा उपयोग करावा.
शर्करा व कोलेस्ट्रॉलचे नियंत्रण आवश्यक
हिवाळ्यात रक्तातील शर्करा व कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मिठाचे सेवन कमी करावे. चालल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि यामुळे रक्तप्रवाह देखील वाढतो. व्यायाम, आहारासह पुरेशा प्रमाणात झोप महत्वाची आहे.
प्रतिबंधात्मक उपाय गरजेचे
थंडीत दमा, फुफ्फुस व श्वसनाचे आजार असणाऱ्या रूग्णांनी शेकोटीपासून दुर राहीले पाहीजे. पाणी भरपुर प्यावे. शक्यतो कोमट पाण्याचा समावेश लाभदायक ठरतो. व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण अधिक असल्यामुळे कोव्हिड काळाप्रमाणे हात धुणे, मास्क वापरणे, अंतर ठेवणे आदी प्रतिबंधात्मक उपायाची गरज आहे.
डॉ. अनिता सैबन्नावर, क्षय रोग, उरोराग विभाग प्रमुख