सिनर, साबालेंका, जोकोविच, अँड्रीव्हा, ओसाका यांची विजयी सलामी
जोकोविच, अॅनिसिमोव्हा, कोको गॉफ, जेसिका पेगुलाही दुसऱ्या फेरीत, आंद्रे रुबलेव, श्वालिन्स्का पराभूत
वृत्तसंस्था, लंडन
2026 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूषांच्या विभागात इटलीचा विद्यमान विजेता जेनिक सिनर, सर्बियाचा माजी टॉपसिडेड नोव्हॅक जोकोविच, तसेच महिलांच्या विभागात बेल्जियमची आर्यना साबालेंका, रशियाची मायरा अँड्रिव्हा, अॅनिसिमोव्हा, अमेरिकेची कोको गॉफ, जपानची नाओमी ओसाका, अमेरिकेची जेसिका पेगुला यांनी विजयी सलामी दिली. पुरूषांच्या विभागात रशियाचा 12 वा मानांकीत आंद्रे रुबलेव, पोलंडची माया श्वालिन्स्का व मॅग्डा लिनेट यांचे आवाहन पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
पुरूषांच्या विभागातील पहिल्या फेरीतील सामन्यात इटलीच्या विद्यमान विजेत्या जेनिक सिनरला विजयासाठी 5 सेट्समध्ये झगडावे लागले. या सामन्यात सिनरने केसमानोव्हीचचा 4-6, 6-3, 6-7 (6-8), 6-2, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. हा सामना सुमारे साडेतीन तास चालला होता. पुरूषांच्या विभागातील अन्य एका सामन्यात सर्बियाच्या जोकोविचने चीनच्या यु इलेकचा 6-4, 5-7, 6-4, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. मात्र रशियाच्या बाराव्या मानांकीत आंद्रे रुबलेवचे आव्हान पहिल्याच फेरीत रोमन सैफुलीनने संपुष्टात आणले. सैफुलीनने झुंजार लढतीत रुबलेवचा 6-4, 6-7 (6-8), 3-6, 6-3, 7-6 (12-10) असा पराभव केला. पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात स्पेनच्या राफेल जोडारने या स्पर्धेत पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शविताना फेलिक्स गिलचे आव्हान 6-3, 6-3, 7-5 असे संपुष्टात आणले.
महिलांच्या विभागात बेल्जियमच्या आर्यना साबालेंकाने विजयी सलामी देताना कोस्टोव्हिकचा 6-2, 6-3 अशा सरळ सेटमध्ये फडशा पाडला. ब्रिटनच्या केटी बोल्टरला पहिल्याच फेरीत तायरा ग्रँटकडून 6-4, 6-2 अशा सेट्समध्ये हार पत्करावी लागली. इमा राडुकानू आणि जॅक ड्रेपर यांनी सोमवारी पहिल्याच दिवशी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. ब्रिटनच्या केटी स्वॉनने रुमानियाच्या इरिना कॅमिला बेगुचा 6-4, 6-4 असा फडशा पाडत विजयी सलामी दिली.
ओसाका विजयी
महिलांच्या एकेरीतील अन्य एका सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने इलेसा जॅक्वेमॉटचा 6-1, 7-5 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. अमेरिकेच्या चौथ्या मानांकीत जेसिका पेगुलाने दार्जा व्हिडीमेनोव्हावर 7-5, 6-3 अशी मात केली. गेल्या महिन्यात फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या माजा श्वालिन्स्काचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. मंचेया सेवांगक्युने श्वालिन्स्काचा 2-6, 7-5, 6-2 असा पराभव करत विजयी सलामी दिली.
फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतील विजेती रशियाच्या मीरा अँड्रिव्हाने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला विजयाने प्रारंभ करताना पोलंडच्या मॅग्डा लिनेटचे आव्हान 7-5, 6-4 असे संपुष्टात आणले. गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेतील उपविजेती अॅनिसिमोव्हाने यावेळी विजयी सलामी देताना लिना गिजोरचेस्काचा 6-3, 6-2 असा फडशा पाडला. अमेरिकेच्या गॉफने कोर्पोरॅथचा 6-2, 6-1 असा पराभव करत विजयी सलामी दिली.