For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्कारेझ, साबालेंका, स्वायटेक यांची विजयी सलामी

06:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
अल्कारेझ  साबालेंका  स्वायटेक यांची विजयी सलामी
Advertisement

अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस : नाओमी ओसाका, अॅनिसिमोव्हा, बेन शेल्टन, मॅटेव बेरेटिनी दुसऱ्या फेरीत, स्विसचा वावरिंका पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/न्यूयॉर्क

2026 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू झालेल्या हंगामातील शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत विद्यमान विजेते स्पेनचा कार्लोस अल्कारेझ तसेच बेलारुसची टॉप सिडेड आर्यना साबालेंका, माजी विजेती इगा स्वायटेक यांनी विजयी सलामी  दिली. महिलांच्या विभागात अॅनिसिमोव्हा व मुचोव्हाने पुढील फेरीत स्थान मिळविले. पुरुषांच्या विभागात अमेरिकेच्या बेन शेल्टनने ग्रीकस्पूरचा तर इटलीच्या बेरेटिनीने स्वीसच्या स्टॅनिसलास वावरिंकाचा पराभव करत पुढील फेरी गाठली. वावरिंकाची ही शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे.

Advertisement

पुरुष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या अल्कारेझने रोमन सैफुल्लीनचा 6-4, 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये फडशा पाडत विजयी सलामी दिली. या स्पर्धेतील विद्यमान विजेता 23 वर्षीय अल्कारेझला गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याला या वर्षाच्या हंगामातील यापूर्वीच्या ग्रँडस्लॅम स्पर्धांना मुकावे लागले होते. अल्कारेझचे या स्पर्धेतील पुनरागमन विजयाने झाले.

अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या आठव्या मानांकीत बेन शेल्टनने ग्रिकस्पूरचा 1-6, 6-1, 7-6 (7-3), 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. शेल्टनला 2003 नंतर अद्याप एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. शेल्टनचा दुसऱ्या फेरीतील सामना पोलंडच्या हुरकेझबरोबर होईल. इटलीच्या अनुभवी मॅटेव बेरेटिनीने स्विसच्या 41 वर्षीय वावरिंकाला पहिल्याच फेरीत 7-6 (7-4), 7-6 (7-3), 6-0 अशा सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. वावरिंकाची ही शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. 2019 साली बेरेटिनीने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. बेरेटिनीचा दुसऱ्या फेरीतील सामना अर्जेंटिनाच्या मारियानो नाव्होनेशी होणार आहे. नाव्होनेने रविवारी या स्पर्धेतील पहिल्याच फेरीतील सामन्यात सर्बियाच्या माजी टॉप सिडेड जोकोविचला पराभवाचा धक्का दिला होता.

महिलांच्या विभागात बेलारुसच्या टॉप सिडेड आणि विद्यमान विजेती आर्यना साबालेंकाने विजयी सलामी देताना कॅमिला ओसोरिओचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. पोलंडच्या माजी विजेत्या इगा स्वायटेकने विजयी सलामी देताना चीनच्या वेंग झीयुचे आव्हान 6-2, 6-3 असे संपुष्टात आणले. जपानच्या नाओमी ओसाकाने विजयी सलामी देताना रशियाच्या बिगर मानांकीत झाकारोव्हाचा 7-6 (8-6), 7-6 (7-3) असा पराभव केला. अन्य एका सामन्यात अमंदा अॅनिसिमोव्हाने अॅस्लीन व्रुगेरवर 6-1, 6-3 अशी मात करत दुसरी फेरी गाठली. अॅनिसिमोव्हाला हा सामना जिंकण्यासाठी 75 मिनिटे झगडावे लागले.

अॅनिसिमोव्हाचा दुसऱ्या फेरीतील सामना ऑस्ट्रीयाच्या लिली टॅगेरशी होणार आहे. टॅगेरने पहिल्या फेरीतील सामन्यात टेमारा कोरपॅचचा 6-0, 7-6 (7-4) असा पराभव केला. हा सामना जवळपास दोन तास चालला होता. विम्बल्डन स्पर्धेतील उपविजेती झेकची कॅरोलिना मुचोव्हाने विजयी सलामी देताना ऑस्ट्रीयाच्या क्रेयुसचा 6-3, 6-0 असा फडशा पाडला. अमेरिकेच्या इमा नेव्हारोने फ्रान्सच्या लोईस बोईसनचा 7-6 (8-6), 6-7 (1-7), 6-3 त्याचप्रमाणे अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंडने पोलंडच्या माजा च्वालिनस्काचा 6-2, 6-3 असा पराभव करत पुढील फेरी गाठली.

Advertisement
Tags :

.