टाटा सन्स संचालक मंडळात बदलाचे वारे
मुंबई :
टाटा समूहाची कंपनी टाटा सन्स आपल्या संचालक मंडळामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या विचारात आहे. टाटा सन्सचे वरिष्ठ सदस्य सेवानिवृत्त होत असून 70 वर्षाचे वरिष्ठ सदस्य भास्कर भट समितीच्या बैठकीमध्ये भाग घेणार आहेत. ही त्यांची शेवटची बैठक असणार आहे.
या बैठकीनंतर ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. यासोबतच जग्वार लँड रोव्हरचे 69 वर्षीय संचालक राल्फ स्पेथ हेदेखील लवकरच पद सोडणार असल्याची माहिती मिळते आहे. भास्कर भट हे टाटा एसआयए एअरलाइन्स कंपनीचे चेअरमन आहेत, जे विस्तारा विस्तारा ब्रँडचे काम पाहतात. एअर इंडिया आणि टाटा एसआयए यांच्या विलीनीकरणानंतर ते कदाचित सल्लागार म्हणून राहू शकतात, असेही म्हटले जात आहे.
भट यांची जागा कोण घेणार
भास्कर भट यांच्या जाण्यानंतर टाटा सन्स मंडळावरती आता चेअरमन एन चंद्रशेखरन आणि सीएफओ सौरभ अग्रवाल यांचे प्रतिनिधित्व राहणार आहे. ट्रस्टच्या सदस्यांमध्ये 76 वर्षीय विजय सिंह, 71 वर्षीय के वेणू श्रीनिवासन यांच्याशिवाय एक स्वतंत्र सदस्य हरीश मनवानी, अजय पिरामल, अनिता एम जॉर्ज आणि लियो पुरी यांचा समावेश आहे. भट यांच्या जागी नियुक्तीसाठी बैठकीमध्ये विचार केला जाणार आहे. टाटा स्टीलचे सीईओ टी व्ही नरेंद्रन आणि ट्रेंटचे नोएल टाटा यांचाही या जागेसाठी विचार केला जात आहे.