महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

खिडकी, निळा पडदा अन् पारतंत्र्य!

06:19 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पावसाळी वातावरण आहे खिडकीतून बाहेर डोकावून पाहता यावे म्हणून दरवाजा खुला करावा आणि अचानक एक न हटवता येण्यासारखा निळा पडदा खिडकीवर स्थिर व्हावा. तो हलूच नये, त्याने पारतंत्र्याची जाणीव करून द्यावी, अशीच जगाची काहीशी अवस्था शुक्रवारी झाली. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज प्रणालीतील क्लाऊड सेवेला अपडेट ठेवण्यास जबाबदार कंपनी चुकली आणि संपूर्ण जग थबकले. अनेक देशात हजारो शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ठप्प झाली. जगात 1400 तर भारतात 56 उ•ाणे रद्द झाली. अमेरिका युरोप आणि आशिया खंडातील सगळ्या विमानतळावर इतक्या रांगा लागल्या की त्या हाताळणे कंपन्यांच्या आवाक्याबाहेर गेले. अनेक देशातल्या 24 तास वृत्तवाहिन्या थंड पडल्या. लंडन शेअर बाजार, ब्रिटन आरोग्य, रेल्वे सेवा रद्द झाल्या. एटीएम, ई-कॉमर्स कंपन्या बंद पडल्या. भारतात विमान कर्मचाऱ्यांनी तिकिटांवर हाताने आसन क्रमांक घालून जुगाड केला. पण, जगभर असे डोके चालले नाही. ते हॅंग झाले. त्यांना अशा व्यत्ययाची सवय नाही आणि तसे प्रशिक्षणही नाही. आपल्या देशातही ताज सारख्या हॉटेलमध्ये संपूर्ण व्यवस्था मोडकळीस आल्याचा अनुभव आलाच. आपल्या बहुमूल्य ग्राहकांना काहीतरी कॉम्प्लिमेंटरी खायला घालून परिस्थिती सुधारेपर्यंत बसून रहा अशी विनंती अशा मोठ्या व्यवस्थापनाला करावी लागते. लोकल रेल्वे ठप्प होणे, रस्त्यावर पाणी साचल्याने टिकाव धरण्यापुरता आसरा शोधून स्वत:चा जीव वाचवणे अशा कलेमध्ये पारंगत असणारे सर्वसामान्य भारतीय या परिस्थितीला कसेतरी तोंड देऊ शकतात. पण, जगभराने आता विचार सुरू केला आहे की, एखादी सॉफ्टवेअर कंपनी जर अशा प्रकारे बंद पडली आणि जग चालायचे थांबले तर काय? याच्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे! अर्थात जग काही थांबत नाही. व्यवहार तेवढेच ठप्प होत असतात, हा आपला भारतीयांचा किंवा आशियाई देशातील लोकांचा अनुभव. तो आपणास नेहमीचा आहे. जगात मायक्रोसॉफ्ट नको असेल तर अॅप्पल स्वीकारा असा पर्याय सांगितला जातो. पण, संगणकावर एकच एक प्रणाली चालत असल्याने ज्यांच्याकडे मायक्रोसॉफ्ट त्यांचे पडदे निळे झाले! ज्यांनी मायक्रोसॉफ्टची पायरेटेड प्रत वापरली त्यांचे संगणक चालूच राहिले कारण ते कधी इंटरनेटला जोडले जात नाहीत आणि जगाशी त्यांचा संबंधच नाही....! अशा प्रकारचे विनोद शुक्रवारी आणि शनिवारी सुद्धा समाजमाध्यमातून मजेने चघळले गेले. काहींनी तर, मालकाचे आपल्या दुकानाकडे लक्ष नसले की असेच होते, असे बिल गेट्स यांच्या वेगवेगळ्या देशातील दौऱ्यांबद्दल टोमणे मारण्याचा आनंद घेतला. या सगळ्या गदारोळात जगात किती लोकांना याचे भयंकर परिणाम सोसावे लागले असतील याचा विचारसुध्दा अंगावर काटा उभा करतो. अशा परिस्थितीत करायचे काय? हा अगतिक करणारा प्रश्न आहे. कारण, ठराविक कंपन्यांचे असलेली मत्तेदारी आणि त्यांना शरण गेलेली संपूर्ण व्यवस्था अशावेळी ठप्प पडणारच. त्या कंपनीकडून काही दुरुस्ती येत नाही तोपर्यंत फक्त बंद निळ्या खिडकीकडे पाहण्याखेरीज आपल्या हाती काही नाही हे जगाला कळून चुकले. या प्रकारानंतर संबंधित कंपनीच्या आणि त्यांना सेवा देणाऱ्या उप कंपन्यांच्या शेअरमध्ये प्रचंड घसरण झाली. असे घडूनसुद्धा या कंपन्या डगमगलेल्या नाहीत. मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखांनी एक ट्विट करून जगाला दिलगिरी व्यक्त केली. आम्ही नेमकी समस्या काय आहे ती शोधली आहे आणि त्याच्यावर काम सुरू आहे, तोपर्यंत होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत इतके म्हणजेच मोजक्या शब्दांचे एक ट्विट त्यांच्यासाठी पुरेसे होते. जगाला काय सोसावे लागले ते त्यांचे त्यांनी सोसावे, कारण त्यांच्यापुढे पर्यायच नाही. घटना घडताच त्याचे पडसाद शेअरबाजारात कंपनीच्या समभागावरही दिसले. शुक्रवारी मायक्रोसॉफ्टचे समभाग 11 टक्क्यांनी गडगडले होते. आज त्यांचे शेअर्स गडगडले असले तरी यांच्याशिवाय पर्याय नाही हे सत्य लोकांना समजले आणि जगातील यांची ताकदही समजली. एकंदर प्रकारानंतर ग्राहक व गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास काहीसा डळमळल्याचेही पाहायला मिळाले. घटना घडली तेव्हा एका झटक्यात 73 हजार कोटी रुपयांचे नुकसानही सोसावे लागले. कंपनी जगभरात सायबर सुरक्षा पोहचवत असते. भविष्यात कदाचित आज पैसे काढून घेणारे गुंतवणूकदार अधिकचे पैसे याच कंपन्यात गुंतवतील आणि या कंपन्या आहे त्यापेक्षाही अधिक बलाढ्या होतील. अमेरिकन भांडवली बाजाराचा दबदबा आहे तो यामुळेच. अमेरिकन कंपन्यांना मिळणारा पैसा आणि त्यातून होणारे संशोधन लक्षात घेतले तरी या सॉफ्टवेअर कंपन्या का मोठ्या झाल्या हे समजते. मात्र मोठे झाल्यानंतर त्यांनी तेथेच न थांबता लोकांच्या आवडीनिवडी, त्यांच्या बदलत्या गरजा, ते कशाचा शोध घेत आहेत या आणि अशा प्रकारची माहिती जमवण्यावरसुद्धा भर देऊन त्यांच्या गरजेप्रमाणे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे सुरूच ठेवल्याने आज या सॉफ्टवेअर कंपन्या जगभरात एकमेव ठरत आहेत. त्यांना पर्याय देण्यासाठी भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांनी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र ट्विटरला देशी पर्याय देणाऱ्या ‘कू’ सारखी त्यांची अवस्था होऊ नये, म्हणजे झालं. भारतीय कंपन्यांनी अशी कोणती प्रणाली विकसित केली तर सरकारने आपल्या दंड संहितेचा वापर करून त्यांच्याकडील माहिती बळकावण्याचा प्रयत्न करू नये. अमेरिका आपल्या कंपन्यांना जशी मोकळीक देते तसे इथे झाले तरच भारतात काही चांगले घडू शकते. यूपीआयसारखा बँकिंगचा जगातील उत्तम पर्याय, नेट प्रोटेक्टर आणि क्विकहेल सारखे अँटिव्हायरस आपल्या भारतात निर्माण होतात तर हा निळा पडदाही हटू शकतो! फक्त त्यांना प्रोत्साहन, स्वातंत्र्य आणि भांडवल द्यावे लागेल. त्यांना जपावे लागेल. शेवटी हीच तर संधी असते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article