विंडीजचा भारतावर 4 धावांनी विजय
गुरुवारी झालेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान विंडीजने भारतावर केवळ 4 धावांनी विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली. 19 धावांत 2 बळी मिळविणाऱ्या जेसन होल्डरला सामनावीराचा बहुमान मिळाला. विंडीजने 20 षटकात 6 बाद 149 धावा जमवत भारताला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. कर्णधार पॉवेल आणि पुरन तसेच किंग यांनी उपयुक्त योगदान दिले. त्यानंतर भारताला 20 षटकांत 9 बाद 145 धावांवर रोखत विजय साकार केला. भारतीय डावात तिलक वर्माने सर्वाधिक 39 धावा फटकावल्या. त्याने 22 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार मारले तर सूर्यकुमारने 21 चेंडूत 21 धावा केल्या. इतरांना विशीच्या पुढे मजल मारता आली नाही. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी 6 रोजी प्राव्हिडन्स येथे होणार आहे.
या पहिल्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किंग आणि मेयर्स या सलामीच्या जोडीने 25 चेंडूत 29 धावांची भागीदारी केली. विंडीजने पॉवर प्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 54 धावा जमवताना 2 गडी गमवले. सलामीचा फलंदाज मेयर्स चहलच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्याने 7 चेंडूत केवळ एक धाव जमवली. चहलने विंडीजचा हा पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवर तर त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने किंगला पायचित केले. किंगने 19 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 28 धावा जमवल्या. विंडीजचे अर्धशतक 35 चेंडूत फलकावर लागले. कुलदीप यादवने चार्ल्सला तीन धावावर झेलबाद केले. तिलक वर्माने त्याचा अप्रतिम झेल घेतला. विंडीजची यावेळी स्थिती 7.3 षटकात 3 बाद 58 अशी होती.
कर्णधार पॉवेल आणि पुरन यांनी चौथ्या गड्यासाठी 38 धावांची भर घातली. विंडीजने 10 षटकाअखेर 3 बाद 69 धावा जमवल्या होत्या. हार्दिक पांड्याने पुरनला तिलक वर्माकरवी झेलबाद केले. त्याने 34 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह 41 धावा जमवल्या. विंडीजचे शतक 86 चेंडूत फलकावर लागले. अर्शदीपने आपल्या दुसत्रा सत्रातील गोलंदाजीवर हेटमायरला झेलबाद केले. त्याने 12 चेंडूत 1 चौकारासह 10 धावा जमवल्या. अर्शदीप सिंगने आपल्या याच षटकातील पाचव्या चेंडूवर पॉवेलला यादवकरवी झेलबाद केले. पॉवेलने 32 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह 48 धावा जमवल्या. शेफर्डने नाबाद 4 तर होल्डरने नाबाद 6 धावा जमवल्या. विंडीजला 8 धावा अवांतराच्या रुपात मिळाल्या. त्यामध्ये 6 वाईड, एक नोबॉल आणि लेगबाईज यांचा समावेश आहे. विंडीजच्या डावात 6 षटकार, 10 चौकार नोंदवले गेले. भारतातर्फे अर्शदीप सिंग व चहल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 20 षटकात 6 बाद 149 (किंग 19 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 28, मेयर्स 1, चार्ल्स 3, पुरन 34 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह 41, पॉवेल 32 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह 48, हेटमायर 12 चेंडूत 1 चौकारासह 10, शेफर्ड नाबाद 4, होल्डर नाबाद 6, अवांतर 8, अर्शदीप सिंग 2-31, चहल 2-24, हार्दिक पंड्या 1-27, कुलदीप यादव 1-20).
भारत 20 षटकांत 9 बाद 145 : इशान किशन 6, गिल 3, सूर्यकुमार 21, तिलक वर्मा 22 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांस 39, हार्दिक पंड्या 19 चेंडूत 19, सॅमसन 12 चेंडूत 12, अक्षर पटेल 11 चेंडूत 13, कुलदीप 3, अर्शदीप 7 चेंडूत 12, चहल व मुकेश कुमार नाबाद 1, अवांतर 15. गोलंदाजी : होल्डर 2-19, मॅकॉय 2-28, शेफर्ड 2-33, अकील हुसेन 1-17.