विंडीजची पाकवर 155 धावांची आघाडी
पाकची पहिल्या डावात घसरगुंडी, दिवसभरात 14 बळी, ग्रीव्सचे पाच बळी
वृत्तसंस्था, टेरोबा
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर विंडीजने पाकवर एकूण 155 धावांची आघाडी घेतली असून त्यांचे दुसऱ्या डावात 3 गडी खेळावयाचे आहेत. तत्पूर्वी पाकचा पहिला डाव 282 धावांत आटोपल्यानंतर विंडीजने दुसऱ्या डावात 7 बाद 126 धावा जमविल्या. दिवसभरात 14 बळी नोंदविले गेले असून हा दिवस गोलंदाजांनी गाजविला.
आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात आहे. या पहिल्या सामन्यात विंडीजने पहिल्या डावात 311 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 3 बाद 199 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे उर्वरित सात गडी 83 धावांत तंबूत परतले. पाकच्या पहिल्या डावात शान मसूदने दमदार शतक झळकविताना 182 चेंडूत 12 चौकारांसह 109 तर इमामुल हकने 102 चेंडूत 7 चौकारांसह 63 धावा जमविल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 155 धावांची दीडशतकी भागिदारी केली. पाकची ही जोडी फुटल्यानंतर विंडीजच्या भेदक वेगवान माऱ्यासमोर त्यांचे उर्वरित फलंदाज झटपट बाद झाले. कर्णधार बाबर आझमने 3 चौकारांसह 23, सलमान आगाने 3 चौकारांसह 20, खुर्रम शहजादने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 19 तर मोहम्मद रिझवानने 1 चौकारांसह 12 धावा जमविल्या. पाकला पहिल्या डावात 31 अवांतर धावा मिळाल्या. विंडीजतर्फे ग्रिव्सने 27 धावांत 5 तर केमर रॉच आणि शमार जोसेफ यांनी प्रत्येकी 2 तर सील्सने 1 गडी बाद केला. विंडीजने पहिल्या डावात 29 धावांची आघाडी मिळविली.
विंडीजच्या दुसऱ्या डावात एकाही फलंदाजाला अधिकवेळ खेळपट्टीवर राहता आले नाही. मोहम्मद अब्बास आणि खुर्रम शहजाद या वेगवान गोलंदाजांनी स्विंग गोलंदाजीवर विंडीजच्या फलंदाजांना चांगलेच पेचात टाकले. सलामीच्या चंद्रपॉलने 5 चौकारांसह 35, होपने 2 चौकारांसह 10 तर ग्रिव्सने 1 चौकारांसह 20 धावा जमविल्या. शमार जोसेफ 3 चौकारांसह 23 तर रॉच 9 धावांवर खेळत आहे. 44 षटकांत विंडीजने दुसऱ्या डावात 7 बाद 135 धावा दिवसअखेर जमवित पाकवर 155 धावांची आघाडी मिळविली आहे. या सामन्यात आतापर्यंत बाद झालेले सर्व 27 गडी वेगवान गोलंदाजांनी मिळविले आहेत. विंडीजच्या दुसऱ्या डावात पाकतर्फे मोहम्मद अब्बासने 14 धावांत 3 तर खुर्रम शहजादने 36 धावांत 2 तसेच मोहम्मद अली आणि अमर जमाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. खेळाच्या तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत पाकने 8 बाद 267 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर खेळाच्या दुसऱ्या सत्रात त्यांचा पहिला डाव 282 धावांत आटोपला. चहापानापर्यंत विंडीजने दुसऱ्या डावात 3 बाद 30 धावांपर्यंत मजल मारली होती. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये विंडीजने आणखीन चार गडी गमविले.
ब्राईन लारा क्रिकेट अकादमीच्या या मैदानावर ही पहिली कसोटी खेळविली जात आहे. मात्र अलिकडच्या दहा महिन्यांच्या कालावधीत पाकिस्तानची फलंदाजी विविध कसोटी मालिकांमध्ये अत्यंत निकृष्ट झाल्याचे दिसून आल्याने या पहिल्या कसोटीत विंडीजवर दडपण आणण्यासाठी त्यांना अधिक जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. पाकच्या तळाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता येत नसल्याचे दिसून येते. द. आफ्रिकाविरुद्ध झालेल्या लाहोरमधील कसोटी सामन्यात पाकने पहिल्या डावात 16 धावांत 5 गडी तर दुसऱ्या डावात 48 धावांत 7 गडी गमविले होते. त्यानंतर रावळपिंडीच्या दुसऱ्या कसोटीत पाकने पहिल्या डावात 17 धावांत 5 तर दुसऱ्या डावात 42 धावांत 6 गडी गमविले होते. मात्र ही मालिका द. आफ्रिकेने बरोबरीत सोडविली होती. गेल्या मे महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकची दुबळी फलंदाजी पुन्हा पहावयास मिळाली. बांगलादेशने ही मालिका 2-0 अशा फरकाने एकतर्फी जिंकली होती. आता विंडीजमधील पहिल्या कसोटीत पाकचा संघ विंडीजला 200 धावांपर्यंत रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
संक्षिप्त धावफलक : विंडीज प. डाव सर्वबाद 311, पाक प. डाव सर्वबाद 282 (शान मसूद 109, इमामुल हक 63, बाबर आझम 23, सलमान आगा 20, खुर्रम शहजाद 19, अवांतर 31, ग्रिव्स 5-27, केमर रॉच व शमार जोसेफ प्रत्येकी 2 बळी, सील्स 1-73), विंडीज दु. डाव 43 षटकाअखेर 7 बाद 126 (चंद्रपॉल 35, होप 10, ग्रिव्स 20, शमार जोसेफ खेळत आहे 22, मोहम्मद अब्बास 3-14, खुर्रम शहजाद 2-36, मोहम्मद अली व अमीर जमाल प्रत्येकी 1 बळी).